आम्लेट पाव विकणाऱ्याचा मुलगा बनला जज; बापलेकावर शुभेच्छांचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 08:03 AM2024-12-01T08:03:44+5:302024-12-01T08:03:58+5:30
वडील एका ठेल्यावर आम्लेट पाव विकायचे. त्यांचा मुलगा आता न्यायमूर्ती बनला आहे. या बापलेकाच्या यशामुळे सारे भारावले आहेत.
औरंगाबाद (बिहार) : आईवडील आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी रक्ताचं पाणी करतात. एवढे कठाेर परिश्रम घेतल्यानंतर मुलगा शिकून माेठा झालेला पाहताच, त्या कष्टाचे त्यांना समाधान मिळते. बिहारच्या औरंगाबादमध्ये एका मुलाने आईवडिलांच्या कष्टाचे चीज करू दाखविले आहे. वडील एका ठेल्यावर आम्लेट पाव विकायचे. त्यांचा मुलगा आता न्यायमूर्ती बनला आहे. या बापलेकाच्या यशामुळे सारे भारावले आहेत.
आदर्श कुमार असे या मुलाचे नाव आहे. ताे बिहार लाेकसेवा आयाेगाच्या अति मागासवर्गीय श्रेणीत न्यायिक सेवा परीक्षेत १२०व्या स्थानी आला आहे. (वृत्तसंस्था)
शिक्षणासाठी आईने गुपचूप घेतले कर्ज
आदर्श कुमार यांच्या कुटुंबात ७ जण आहे. वडिलांचे उत्पन्न जेमतेम असते. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी शक्य तेवढे प्रयत्न केले.
पैसे अपुरे पडू नयेत, यासाठी त्याची आई सुनैना यांनी स्वयंसहायता गटाकडून कर्जही घेतले. मात्र, हे त्यांनी आतापर्यंत लपवून ठेवले हाेते.
स्थिती हलाखीची
या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. आदर्श कुमार याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. वडील विजय साव हे ठेला चालवायचे. दुसरीकडे आईनेही तेवढेच परिश्रम घेतले आहेत.
आईवडिलांकडून मिळाली प्रेरणा
मुलाने आईवडिलांच्या कष्टाचा मान राखत कठाेर परिश्रम घेतले. त्यांची मेहनत पाहून मला प्रेरणा मिळाली आणि मन लावून अभ्यास केला. म्हणूनच हे यश मिळाले, असे आदर्श कुमार याने सांगितले.