Surya Grahan 2019 : अरे बापरे! एवढी आहे ग्रहण पाहताना नरेंद्र मोदींनी घातलेल्या गॉगलची किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 05:59 PM2019-12-26T17:59:02+5:302019-12-26T17:59:15+5:30
Surya Grahan 2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्रहण पाहतानाची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. पण पंतप्रधानांच्या या फोटोंपेक्षा त्यांनी घातलेल्या गॉगलचीच चर्चा अधिक झाली
नवी दिल्ली - आज झालेले कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्यासाठी सर्वसामान्यांप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उत्सुकता दाखवली. सकाळी ग्रहणाला सुरुवात झाल्यावर पंतप्रधान मोदींनी विशिष्ट उपकरणांद्वारे ग्रहण पाहिले. पंतप्रधानांचे ग्रहण पाहतानाची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. दरम्यान, पंतप्रधानांच्या या फोटोंपेक्षा त्यांनी घातलेल्या गॉगलचीच चर्चा अधिक झाली. काही नेटकऱ्यांनी तर मोदींच्या या गॉगलचा ब्रँड आणि त्याची किंमतही शोधून काढली आहे.
ग्रहण पाहताना मोदींनी घातलेला गॉगल हा मायबॅड आयवेअर या जर्मन कंपनीचा असल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला आहे. या गॉगलची किंमत ही हजारो डॉलरच्या घरात असते. मोदींचा गॉललही अशाच महागड्या गॉगलपैकी असून, दि डिप्लोमॅट वर या प्रकारामधील हा गॉगल सुमारे दोन हजार 159 डॉलर किमतीचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतीय चलनामध्ये विचार करावयाचा झाल्यास या गॉगलची किंमत दीड लाख ते एक लाख 65 हजारांपर्यंत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयाच्या निवस्थानामधून सूर्यग्रहण पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र ढगाळ वातावरणामुळे त्यांना थेट सूर्यग्रहण पाहता आले नसल्याचे खुद्द नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले होते.
दरम्यान, शास्त्रज्ञांसोबत सूर्यग्रहण पाहत असल्याचे फोटो मोदींनी ट्विटरवर शेअर केले होते. नरेंद्र मोदींच्या ट्विटनंतर एका नेटकऱ्याने रिट्विट करत तुमचा फोटो सोशल मीडियावर मीम्समध्ये वापरला जात असल्याचे सांगितले. मग नरेंद्र मोदी यांनी देखील तुमचे आभार असल्याचे सांगत आनंद घ्या असं मिश्कील उत्तर दिलं.
चंद्र पृथ्वीपासून दूर असताना त्याचा आकार नेहमीपेक्षा थोडा लहान दिसतो. अशा वेळी अमावास्येची तिथी व हे तीनही गोल सरळ रेषेत आले, तर ‘सूर्यग्रहण’ घडते; पण लहान दिसणारा चंद्र सूर्याला पूर्ण झाकू शकत नाही. परिणामी, सूर्यबिंबाचा कडेचा भाग एखाद्या बांगडीप्रमाणे दिसतो. या खगोलीय घटनेस ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ म्हणतात.