OMG! अर्ध्या वाटेवरूनच बेपत्ता झाली पुणे-गोरखपूर जनसाधारण विशेष एक्स्प्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 09:26 AM2018-04-27T09:26:53+5:302018-04-27T09:26:53+5:30
अनेक आश्चर्यांनी भरलेल्या आपल्या देशात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. आतातर अख्खी रेल्वेच अर्ध्या वाटेवरून बेपत्ता झाल्याची आश्चर्यकारक आणि तेवढीच धक्कादायक घटना घडली आहे.
लखनौ - अनेक आश्चर्यांनी भरलेल्या आपल्या देशात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. आतातर अख्खी रेल्वेच अर्ध्या वाटेवरून बेपत्ता झाल्याची आश्चर्यकारक आणि तेवढीच धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार गुरुवारी उत्तर प्रदेशातील कानपूर आणि लखनौदरम्यान घडला. पुण्याहून गोरखपूरला निघालेली विशेष ट्रेन गुरुवारी नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टिमवर दिसायची बंद झाली. त्यामुळे ही ट्रेन नेमकी कुठे आहे हे रेल्वे अधिकाऱ्यांनाही कळेनासे झाले. ट्रेनबाबत माहिती मिळत नसल्याने रेल्वे प्रशासनामध्ये खळबळ उडाली. तसेच प्रवाशांचाही गोंधळ उडाला.
पुणे गोरखपूर जनसाधारण स्पेशल ट्रेन-01453 दर रविवारी पुण्याहून गोरखपूरसाठी चालवली जाते. ही गाडी तीन दिवस प्रवास करून गोरखपूरला पोहोचते. मात्र या आठवड्यात ही गाडी सुमारे 26 तास उशिराने सोमवारी रात्री 8 वाजता पुण्याहून रवाना झाली. ही ट्रेन अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, झाशी असा प्रवास करत 24 एप्रिल रोजी सकाळी 7.38 वाजता कानपूरला पोहोचली. प्रवासाच्या पहिल्या दिवशी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर एनटीइएसने ट्रेन किती वाजता कुठे पोहोचली याची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर मात्र ट्रेनचे लोकेशन मिळणे बंद झाले.
तपास केल्यावर पुणे गोरखपूर जनसाधारण स्पेशल ट्रेन एनटीईएसवर 24 एप्रिल रोजी सकाळी कानपूरच्या गुड्स मार्शलमध्ये उभी असल्याचे सांगितले जात होते. पुढे या ट्रेनचे काय झाले याची माहिती मात्र मिळत नव्हती. तीन दिवस उलटल्यानंतही ही ट्रेन लखनौला पोहोचलेली नाही. कंट्रोल रूमपासून रेल्वेच्या अधिकाऱ्यांपर्यंत कुणालाही ट्रेन कुठे गेली याची माहिती कुणालाही नाही. एनटीसईएसवर तपासले असता 24 एप्रिलपासून आतापर्यंत ही ट्रेन कानपूर गुड्स मार्शलमध्येच उभी असल्याचे दिसत आहे. सोबतच ही ट्रेन चालवण्यात येत आहे, पण पुढे येत नसल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच रेल्वे प्रशासन या प्रकरणी काहीही बोलणे टाळत आहे.
मग ट्रेन धावलीच नाही?
हे संपूर्ण प्रकरण एनटीईएसमधील गोंधळाचे आहे, असा दावा सूत्रांनी केला आहे. ही ट्रेन सोर्स स्टेशन पासून चालवण्यातच आली नसल्याचेही बोलले जात आहे. मात्र अचानक रद्द करण्यात आलेली ही ट्रेन एनटीईएसवर मात्र धावत आहे.