बाबो...! रेल्वेने काढलेली 1.39 लाख जागांवर भरती, 2.37 कोटी उमेदवारांचे अर्ज आलेले; मंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 11:26 PM2024-02-09T23:26:35+5:302024-02-09T23:27:10+5:30
गेल्या पाच वर्षांत रेल्वेद्वारे किती नवीन कर्मचारी भरती करण्यात आले असे विचारण्यात आले होते. तसेच रेल्वेने येत्या काळात आपल्या मनुष्यबळात कपात करण्याचे ठरविले आहे का असाही सवाल केला होता.
देशात बेरोजगारी कितीय? जो तो उठतोय तो सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करतोय. करोडो लोक बेरोजगार आहेत. अशातच रेल्वेने १.३९ लाख जागांसाठी नुकतीच भरती काढली होती. यासाठी २.३७ कोटी उमेदवारांचे अर्ज आले होते. यामुळे एवढ्या उमेदवारांची परीक्षा घेण्याचे आणि त्यातून त्यांची निवड करण्याचे मोठे आव्हान रेल्वेला पेलावे लागले आहे.
गेल्या पाच वर्षांत आणि चालू वर्षात ३०२५५० उमेदवारांची विविध गटातील ग पदांसाठी निवड करण्यात आली. खासदार एम व्ही सत्यनारायण यांनी रेल्वे मंत्र्यांना याबाबत प्रश्न विचारला होता. गेल्या पाच वर्षांत रेल्वेद्वारे किती नवीन कर्मचारी भरती करण्यात आले असे विचारण्यात आले होते. तसेच रेल्वेने येत्या काळात आपल्या मनुष्यबळात कपात करण्याचे ठरविले आहे का असाही सवाल केला होता.
यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, भारतीय रेल्वेचे प्रस्थ आणि विस्ताराचे महत्व पाहता पदे रिक्त होणे आणि ती भरली जाणे ही एक सततची प्रक्रिया आहे. या भरती केल्या जातात. नुकतीच 1.39 लाख पदे भरण्यासाठी दोन परीक्षा घेण्यात आल्या होत्या. यासाठी २.३७ कोटी उमेदवार आले होते, असे मंत्र्यांनी सांगितले.
नवीन तंत्रज्ञानाचा परिचय, कार्यप्रणाली, नवीन मालमत्तेची निर्मिती इत्यादी बाबी लक्षात घेऊन मनुष्यबळ नियोजनातील मंजूर पदांच्या संख्येचा सातत्याने आढावा घेण्याची गरज आहे, असे रेल्वेमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.