Coronavirus: ओमायक्रॉनची धास्ती! केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय?; ‘या’ लोकांना मिळणार लसीचा बूस्टर डोस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 02:39 PM2021-12-03T14:39:46+5:302021-12-03T14:41:48+5:30
Omicron: आतापर्यंत सुरक्षित राहिलेल्या भारताचा गुरुवारी ओमायक्रॉन संक्रमित देशांच्या यादीत नाव समाविष्ट झालं. कर्नाटकात परदेशातून आलेले २ प्रवाशी कोरोना बाधित निघाले आणि त्यांना ओमायक्रॉन व्हेरिएंट असल्याचं निष्पन्न झालं.
नवी दिल्ली – अमेरिका, ब्रिटनसह जगातील बहुतांश देशात ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता बूस्टर डोस जनतेला देण्याची प्रक्रिया वेगाने सुरु झाली आहे. आता भारतातही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे ४० वर्षावरील सर्व लोकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्यात यावा अशी शिफारस करण्यात आली आहे. ही शिफारस केंद्र सरकारला टॉप इंडियन जीनोम साइंटिस्टकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता केंद्राने निर्णय घेतल्यास ४० वर्षावरील लोकांना लसीचा बूस्टर डोस घ्यावा लागू शकतो.
ही शिफारस भारतीय SARS Cov 2 जीनोमिक्स सिक्वेंसिंग कंसोर्टियमने त्यांच्या साप्ताहिक बुलेटिनमध्ये केली आहे. INSACOG कोरोनाचा जीनोमिक व्हेरिएशन मॉनिटर करण्यासाठी भारत सरकारने नॅशनल टेस्टिंग लॅबचं नेटवर्क बनवलं होतं. INSACOG बुलेटिनमध्ये म्हटलंय की, ज्या लोकांनी लस घेतली नाही अशांचं लसीकरण आणि ४० वर्षावरील लोकांना बूस्टर डोस देण्याचा विचार केला जाऊ शकतो. सर्वात आधी मोस्ट हायरिस्क लोकांना प्राधान्य द्यायला हवं.सध्या लोकसभेत कोरोनावर चर्चा सुरु आहे त्यावेळी खासदारांनी बूस्टर डोसची मागणी केली अशावेळी ही शिफारस आली आहे.
भारतात ओमायक्रॉनचा शिरकाव
आतापर्यंत सुरक्षित राहिलेल्या भारताचा गुरुवारी ओमायक्रॉन संक्रमित देशांच्या यादीत नाव समाविष्ट झालं. कर्नाटकात परदेशातून आलेले २ प्रवाशी कोरोना बाधित निघाले आणि त्यांना ओमायक्रॉन व्हेरिएंट असल्याचं निष्पन्न झालं. हे दोन्ही रुग्ण ६६ आणि ४६ वर्षाचे आहेत. दोघांनीही लसीचे डोस घेतले होते. या दोन्ही रुग्णात कोरोनाची सौम्य लक्षणं होती. त्यातील एक व्यक्ती भारतातून दुबईला गेला आहे. आतापर्यंत २९ देशांमध्ये ओमायक्रॉननं संक्रमित रुग्ण आढळले आहेत. WHO ने व्हेरिएंट ऑफ कंसर्नमध्ये ओमायक्रॉनचा समावेश केला आहे. सर्वात पहिले दक्षिण आफ्रिकेत या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले होते.
रिपोर्टनुसार २७ नोव्हेंबरपर्यंत कोरोनाबाधित झालेल्या २८ लाख लोकांपैकी ३५ हजार, ६७० जणांना पुन्हा संसर्ग झाल्याची शक्यता आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर ९० दिवसांनंतर जर कुणाचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर त्याला रिइन्फेक्शन मानले जाते. ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या स्पाईक प्रोटिनमध्ये मोठ्या प्रमाणात म्युटेशन असल्याने तो अधिक संसर्गजन्य असू शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांनी आधीच वर्तवली होती.