Omicron: 'त्या' जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू करा; ICMR ची सूचना, प्रतिबंधक नियम पाळण्याचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 05:42 AM2021-12-11T05:42:32+5:302021-12-11T05:43:12+5:30
मास्क वापरण्याचे कमी झालेले प्रमाण चिंताजनक, या नव्या विषाणूमुळे येणारी साथ नेमके कसे तडाखे देईल याचा थांग अजून लागलेला नाही. अशा स्थितीत प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी, प्रतिबंधक उपायांचे पालन करावे.
नवी दिल्ली : ओमायक्रॉन या नव्या विषाणूचा जगभरात झालेला प्रसार चिंताजनक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. भारतात मास्क वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सद्य:स्थितीत नागरिकांनी वेळीच सावध होऊन मास्क घालणे व इतर प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करीत राहणे आवश्यक आहे, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे. हा केंद्राने एक प्रकारे राज्यांना दिलेला सावधगिरीचा इशाराच आहे.
त्यांनी सांगितले की, कोरोना लस व मास्क या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत हे कोणीही विसरता कामा नये. ओमायक्राॅनमुळे जगभरात जी स्थिती निर्माण झाली आहे, त्यापासून धडा घेऊन भारतातील नागरिकांनी वेळीच दक्षता घेण्याची गरज आहे. मास्क वापरणे बंद करण्याची वेळ अद्यापि आलेली नाही. कोरोनाची साथ अजूनही जगभर कायम आहे. डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, ओमायक्रॉनमुळे अमेरिका व इंग्लंडमध्ये पुन्हा कोरोनाची मोठी लाट आली आहे. या नव्या विषाणूमुळे येणारी साथ नेमके कसे तडाखे देईल याचा थांग अजून लागलेला नाही. अशा स्थितीत प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्यावी, प्रतिबंधक उपायांचे पालन करावे.
जास्त संसर्गदर असल्यास निर्बंध
आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, कोरोना साथ आणखी पसरू नये यासाठी सर्वांनी आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. जिथे पाच टक्क्यांपेक्षा जास्त संसर्गदर आढळेल तिथे जिल्हास्तरावर योग्य ते निर्बंध लागू करण्यात आले पाहिजेत.