Omicron in India: गेल्या 24 तासांत 9,195 कोरोनाग्रस्तांची नोंद, तर ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 781वर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 11:04 AM2021-12-29T11:04:01+5:302021-12-29T11:04:22+5:30
Omicron in India: गेल्या 24 तासांत 302 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या देशात 77 हजारांहून अधिक कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
नवी दिल्ली: आफ्रिकन देशांमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली आहे. भारतातही दिवसेंदिवस याचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत भारतातील अनेक राज्यात ओमायक्रॉनची प्रकरणे आढळत असून, रुग्णसंख्या 781 वर पोहोचली आहे. तसेच, गेल्या 24 तासांत देशात 9 हजार 195 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 302 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या देशात 77 हजारांहून अधिक कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नवीन आकडेवारीसह देशातील कोरोना बाधितांची संख्या 3 कोटी 48 लाख 8 हजार 886 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 4 लाख 80 हजार 592 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.
केंद्रशासित प्रदेशात ओमायक्रॉन दाखल
नवीन आकडेवारीनुसार, 781 ओमायक्रॉन रुग्णांपैकी 241 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राजधानी दिल्लीत सर्वाधिक 238 रुग्ण असून, महाराष्ट्रात 167 रुग्ण आहेत. आतापर्यंत देशभरातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ओमायक्रॉनग्रस्त आढळले आहे. अलीकडेच मणिपूर, लडाख, हिमाचल प्रदेश, गोवा येथेही पहिला रुग्ण आढळून आलाय.
महाराष्ट्रातील आकडेवारी
मंगळवारी महाराष्ट्रात कोविड-19 चे 2,172 नवीन रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या 66,61,486 झाली आहे, तर आणखी 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 1,41,476 वर पोहोचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली. दिलासा देणारी बाब म्हणजे गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हायरसचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. राज्यात आतापर्यंत ओमिक्रॉनच्या 167 प्रकरणांची पुष्टी झाली आहे.
दिल्लीतील परिस्थिती
मंगळवारी दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 496 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, 4 जूनपासून एका दिवसात नोंदलेली सर्वाधिक संख्या आहे. राजधानीत, गेल्या 24 तासांत महामारीमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला, तर संसर्ग दर 0.89 टक्क्यांवर पोहोचला आहे. दिल्लीत आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गाची एकूण 14,44,179 प्रकरणे समोर आली आहेत.