Omicron In India: राजस्थानात Omicron चा कहर, एकाच दिवशी सापडले २१ रुग्ण; देशातील आकडा ४०० पार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 05:03 PM2021-12-25T17:03:24+5:302021-12-25T17:04:14+5:30
Omicron In India: देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिअंटचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना दिसून येत आहे. राजस्थानात आज ओमायक्रॉन व्हेरिअंटचे २१ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
Omicron In India: देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिअंटचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना दिसून येत आहे. राजस्थानात आज ओमायक्रॉन व्हेरिअंटचे २१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर महाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरिअंटची बाधा झालेल्या रुग्णांचा आकडा १०८ वर पोहोचला आहे. दिल्लीतर हाच आकडा ७९ इतका झाला आहे. त्यातच नववर्ष आणि ख्रिसमसचा काळ असल्यानं सेलिब्रेशनचा सीझन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यात नाइट कर्फ्यूसारखे नियम लादण्याचा निर्णय काही राज्यांनी घेतला आहे. तर काही राज्यांनी सेलिब्रेशनवरच बंदी घातली आहे.
राजस्थानात एकाच दिवशी २१ रुग्ण आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. आजच्या २१ रुग्णांसह आता राजस्थानातील ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ४३ इतकी झाली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य खात्यानं दिली आहे. राजस्थान व्यतिरिक्त महाराष्ट्रातही ओमायक्रॉनचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात धोका अधिक असून ओमायक्रॉनच्या रुग्णांचा आकडा १०८ वर पोहोचला आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्येही ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेतय तामिळनाडूत ३४, तर केरळमध्येही ३७ रुग्ण आढळून आले आहेत. तेलंगणात एकूण ३८ रुग्ण आढळून आले आहेत.
Rajasthan | 21 new cases of #Omicron reported today, taking the total tally to 43: State Health Dept
— ANI (@ANI) December 25, 2021
राजेश टोपेंनी दिला इशारा
महाराष्ट्रातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं आहे. राज्यात नाइट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. ओमायक्रॉनच्या संसर्गाची गती अशीच कायम राहिली तर तिसरी लाट आलीच तर ती ओमायक्रॉनचीच असेल अशी दाट शक्यता आहे, असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ओमायक्रॉनच्या संसर्ग दुपटीनं होत असल्याचं दिसून येत असलं तरी भीती बाळगण्याचं कोणतंही कारण नाही. तसंच राज्यातील निर्बंधांबाबत कुणीही चुकीचा समज करुन घेण्याचं कारण नसल्याचंही ते म्हणाले. सध्याचा लग्नसराई, ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताचा काळ लक्षात घेता नागरिकांची जास्त गर्दी होऊ नये यासाठी निर्बंध लादण्यात आले आहेत असं राजशे टोपे यांनी यावेळी स्पष्ट केलं.