Omicron: कोरोनाला हरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला ‘3T’चा मंत्र; उच्चस्तरीय बैठकीत काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 10:33 AM2022-01-10T10:33:13+5:302022-01-10T10:34:02+5:30
देशात आलेल्या कोरोनाच्या लाटेचं आव्हान रोखण्यासाठी सज्ज राहा असे निर्देश पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांना दिले.
नवी दिल्ली – देशात ओमायक्रॉनमुळे(Omicron) कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी संध्याकाळी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या(PM Narendra Modi) अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झालेल्या या बैठकीत अधिकाऱ्यांना कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी 3T चा मंत्र दिला आहे.
देशात आलेल्या कोरोनाच्या लाटेचं आव्हान रोखण्यासाठी सज्ज राहा असे निर्देश पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांना दिले. कोरोनाच्या सध्या परिस्थितीचा आढावा घेत लसीकरण मोहिमेवरही भर देण्याच्या सूचना मोदींनी दिल्या. जिल्हास्तरीय आरोग्य यंत्रण सुसज्ज करा, लसीकरणात लहान मुलांच्या लसीकरणावर भर द्या. टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रिटमेंट या 3T चा मंत्र पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांना दिला.
या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, जिल्हास्तरावर कोरोनाशी लढण्यासाठी यंत्रणा मजबुत ठेवा. कोविड नियमांचे पालन करण्यावर भर द्या. त्याचसोबत जीनोम सिक्वेसिंग आणि वैज्ञानिक रिसर्चवरही मोदींनी भर दिला. या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, गृहमंत्री अमित शाह, गृह सचिव, कॅबिनेट सचिव, कोविड टास्क फोर्सचे अधिकारीही उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी पंतप्रधान मोदींनी कोरोनाचा आढावा घेण्यासाठी घेतलेल्या बैठकीनंतर ट्विट करुन ही माहिती दिली. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत व्हर्चुअल बैठकीच्या माध्यमातून कोरोना स्थितीचा आढावा घेतला. कोरोनाच्या सद्यस्थितीवर केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे. मोदींनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 3T मंत्र दिला आहे. टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रिटमेंट हा 3T मंत्र आहे. आपल्या सगळ्यांना सरकारच्या प्रयत्नांना साथ द्यायला हवी. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन चुकूनही करु नका असं आवाहन त्यांनी केले.
आदरणीय प्रधानमंत्री जी ने आज कोरोना की तीसरी लहर के मद्देनज़र वर्चुअल मीटिंग कर वर्तमान स्थिति की समीक्षा की। वे ताजा हालात पर लगातार नज़र बनाए हुए हैं।
— Gajendra Singh Shekhawat (@gssjodhpur) January 9, 2022
मोदीजी ने फैलाव रोकने के लिए #3T टेस्टिंग, ट्रैकिंग और ट्रीटमेंट का मंत्र दिया था। #IndiaFightsCoronapic.twitter.com/YrkpdGb7Ts
ओमायक्रॉनमुळे रुग्णसंख्येत वाढ
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासांत कोरोना व्हायरसचे १, ७९ लाख रुग्ण समोर आले आहेत. गेल्या २२४ दिवसांतील हा सर्वाधिक मोठा आकडा आहे. देशात सक्रीय रुग्णांची संख्या ५ लाख ९० हजाराहून अधिक आहे. मागील २४ तासांत ३२७ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ४ लाख ८३ हजार ७९० रुग्ण दगावले आहेत. ओमायक्रॉनची रुग्णसंख्या ३ हजार ६२३ इतकी झाली आहे. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सर्वाधिक १ हजार रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर दिल्लीत ५१३, कर्नाटक ४४१, राजस्थान ३७३, केरळ ३३३, गुजरात २०४ असे ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत.