Omicron: ओमायक्रॉनमुळे पुढील ४५ दिवसांत भारतात कोरोनाची लाट आली तरी घाबरण्याचं कारण नाही, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 09:48 AM2021-12-10T09:48:29+5:302021-12-10T09:49:30+5:30
द. आफ्रिकेतील प्रत्येक चौथी व्यक्ती आढळतेय पॉझिटिव्ह, आठवडाभरातील रुग्णसंख्या पुन्हा लाखावर
ओमायक्रॉन विषाणूमुळे कोरोना रुग्णांची संख्या किती वेगाने वाढू शकते याचा प्रत्यय दक्षिण अफ्रिकेत येत आहे. डिसेंबरच्या पहिल्या सहा दिवसांतच या देशात ७० हजार नवे रुग्ण आढळले होते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात २०० ते ३०० रुग्ण रोज आढळत होते. आता ही संख्या ८ हेत १० हजारांवर गेली आहे. ही आकडेवारी बघून जगही सतर्क झाले आहे.
रोज कुठे आढळताय सर्वाधिक नवे रुग्ण
इंग्लंड - ४५,६९१
जर्मनी - ५१,५९२
रशिया - ३१,०९६
अमेरिका - १,०७,६४२
फ्रान्स - ५९,०१९
सर्वाधिक रुग्णवाढीचा दर सध्या अफ्रिकेतील देशांमध्ये असला तरी तेथील मृत्यूचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे ओमायक्रॉनमुळे तिथे संसर्ग वाढला असला तरी तिथे मृत्यूचे प्रमाण कमी आहे.
सर्वाधिक कोरोना बळी सध्या कुठे होताहेत?
अमेरिका : १७२२
रशिया : ११८२
पोलंड : ५०४
युक्रेन : ४६७
जर्मनी : ४४८
लाट आली तरी...
अफ्रिकेत चौथी लाट येण्याचा धोका व्यक्त होत आहे. भारतातही जानेवारीत लाट येईल, अशी भीती व्यक्त केली जातेय. ओमायक्रॉनमुळे लाट आली तरीही ती फार धोकादायक नसेल, दुसऱ्या लाटेसारखी जीवघेणी नसेल असेच सध्याच्या स्थितीवरून दिसत आहे. कारण या विषाणूमुळे कोरोना झाला तरी लक्षणे मात्र सौम्य आहेत. अनेकांवर घरीच उपचार सुरू आहेत.