Coronavirus: ओमायक्रॉनचा धोका! कोरोनाच्या २ लाटांपेक्षा तिसरी लाट मोठी; महाराष्ट्रात परिस्थिती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 10:00 AM2022-01-03T10:00:26+5:302022-01-03T10:02:31+5:30
बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा,झारखंड, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
नवी दिल्ली – नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची धास्ती सगळ्या देशांनी घेतली आहे. ओमायक्रॉनमुळे रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कमी असले तरी निष्काळजीपणा करु नये. डिसेंबर २०२१ च्या अखेरीस कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत होते. कोरोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरिएंट अतिशय वेगाने पसरत आहे. त्यामुळे जर मोठ्या संख्येत ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली आणि त्यातील काहींना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली तर आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढू शकतो. ओमायक्रॉन वेगाने संक्रमित करत असल्याने पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या तुलनेत ही लाट अधिक वेगाने पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकाच दिवसात विक्रमी रुग्णसंख्येची नोंद होण्याची भीतीही प्रशासनाच्या मनात आहे.
बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा,झारखंड, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात गेल्या काही दिवसांत संक्रमितांचा आकडा वाढतोय. दिल्ली, मुंबई, कोलकातासारख्या देशातील विविध भागात कोरोना रुग्णांची संख्या कित्येक पटीने वाढली आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत या रविवारी जवळपास ३ पटीने कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.
२७ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत भारतात जवळपास १.३ लाख कोरोनाचे नवे रुग्ण आढळले. गेल्या १२ आठवड्यातील हा सर्वात मोठा आकडा आहे. देशात महामारीच्या सुरुवातीपासून संक्रमणात आतापर्यंत हा आकडा मोठा आहे. याआधी ५ ते ११ एप्रिल दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ७१ टक्के रुग्णसंख्या वाढली होती. दिल्लीत पॉझिटिव्ही रेट ४.५९ टक्के आहेत. मुंबईत संक्रमणाचा दर १७ टक्क्याहून अधिक झाला आहे. जयपूरमध्ये ४.४. टक्के, बंगालमध्ये १२ टक्क्याहून अधिक झाला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये अंशत: लॉकडाऊन निर्बंध लावण्यात आले आहेत. गोवा येथे संक्रमणाचा दर १०.७ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.
कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये ओमायक्रॉनची लागण झालेल्यांची संख्या अधिक आहे. DDMA योजनेंतर्गंत जर संक्रमण सातत्याने ५ टक्क्याहून अधिक राहिला तर रेड अलर्ट घोषित केला जाऊ शकतो. ज्यामुळे अनेक भागात पूर्ण कर्फ्यू लावण्यात येईल. त्याचा फटका आर्थिक उलाढालीवर होऊ शकतो. दिल्लीत मागील वर्षी २० मे रोजी ५.५० संक्रमण दरासोबत ३ हजार २३१ रुग्ण आढळले होते. त्या एका दिवसात २३३ संक्रमितांचा मृत्यू झाला होता.
मुंबईची स्थिती चिंताजनक
महाराष्ट्रात रविवारी कोरोनाचे ११ हजार ८७७ रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉनच्या संख्येत ५० रुग्णांची भर पडली आहे. राज्यात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४२ हजार २४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबईत १०,३९४ रुग्ण आढळले ते राज्यातील एकूण संक्रमितांमध्ये ९० टक्के आहे. शहरात २७ डिसेंबरला ८०९ रुग्ण आढळले होते म्हणजे रविवारपर्यंत संक्रमण १० पटीने वाढले आहे. शनिवारी महाराष्ट्रात कोविडचे ९ हजार १७० रुग्ण आढळले होते.