Omicron Variant : ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकार सतर्क; राज्यांना परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 09:28 PM2021-12-11T21:28:55+5:302021-12-11T21:37:25+5:30
Omicron Variant: कोविड चाचण्या आणि पाळत ठेवणे, इन्फ्लूएंझा सारखे आजार आणि श्वसनाचे आजार आणि आरटी-पीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात एक नवीन भीती निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटला चिंताजनक म्हटले आहे आणि सर्व देशांना सावध राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवरील स्थगितीचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर, केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास आणि नवीन प्रकरणांच्या क्लस्टरवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर उपाययोजना करण्यास सांगितले आहे.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, गेल्या दोन आठवड्यात केरळ, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, पुद्दुचेरी, मणिपूर, पश्चिम बंगाल आणि नागालँडमधील 19 जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण पाच ते दहा टक्क्यांच्या दरम्यान आहे. ते म्हणाले की, मिझोराम, केरळ आणि सिक्कीममधील आठ जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन आठवड्यात कोविड संसर्गाचे प्रमाण 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
याचबरोबर, 10 राज्यातील 27 जिल्ह्यांवर बारीक नजर ठेवण्याची गरज आहे, असे राजेश भूषण यांनी पत्रात लिहिले आहे. ते म्हणाले की, या संदर्भात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणे आणि कोविड -19 च्या नवीन प्रकरणांच्या क्लस्टरवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. जर एखाद्या जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असेल किंवा संसर्गाचे प्रमाण वाढत असेल, तर कंटेनमेंट झोनच्या रुपरेषेनुसार स्थानिक नियंत्रण सुरू केले पाहिजे, असे राजेश भूषण म्हणाले.
रात्री कर्फ्यूसारख्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना
ज्या भागात संसर्गाचे प्रमाण 10 टक्क्यांहून अधिक आहे किंवा रुग्णालयांतील 60 टक्के खाटा कोविड-19 रुग्णांनी भरलेल्या आहेत किंवा आयसीयूमध्ये 60 टक्क्यांहून अधिक खाटा रुग्ण आहेत, तेव्हा रात्रीचा कर्फ्यू, लोकांच्या येण्या-जाण्यावर निर्बंध, गर्दीवर निर्बंध (सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, सण संबंधित), विवाहसोहळे आणि अंत्यविधीमध्ये लोकांची उपस्थिती मर्यादित करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली पाहिजेत, असे राजेश भूषण म्हणाले.
याचबरोबर, कोविड चाचण्या आणि पाळत ठेवणे, इन्फ्लूएंझा सारखे आजार आणि श्वसनाचे आजार आणि आरटी-पीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे. कोविड-19 च्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी राज्य स्तरावर नियमित पावले उचलली जावीत, असेही राजेश भूषण यांनी सांगितले.