Omicron Variant : भारतात ओमायक्रॉन घेतोय डेल्टाची जागा, विदेशातून येणाऱ्या प्रवाशांपैकी ८० टक्के लोक ओमायक्रॉनबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 05:49 AM2022-01-01T05:49:53+5:302022-01-01T05:50:19+5:30
Omicron Variant: कोरोना चाचण्यांमध्ये गेल्या काही दिवसांत झालेली घट चांगली नाही, असा इशारा केंद्र सरकारने १९ राज्यांना नुकताच दिला होता. ओमायक्रॉनमुळे संसर्गाचे प्रमाण खूपच वाढणार आहे, याकडेही केंद्राने लक्ष वेधले होते.
नवी दिल्ली : देशात आता डेल्टा विषाणूची जागा ओमायक्रॉन संसर्गाने घेण्यास सुरुवात झाली आहे. विदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांपैकी ८० टक्के लोक हे ओमायक्रॉनचे बाधित असतात. मात्र, नव्या विषाणूच्या काही रुग्णांमध्ये संसर्गाची सौम्य लक्षणे आढळून आली. कोरोना चाचण्यांमध्ये गेल्या काही दिवसांत झालेली घट चांगली नाही, असा इशारा केंद्र सरकारने १९ राज्यांना नुकताच दिला होता. ओमायक्रॉनमुळे संसर्गाचे प्रमाण खूपच वाढणार आहे, याकडेही केंद्राने लक्ष वेधले होते.
नवा विषाणू फायझर लसीला दाद देईना
कोरोनातून बरे झालेल्या तसेच फायझरच्या लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांच्या शरीरात तयार झालेल्या अँटिबाॅडीजना ओमायक्रॉन दाद देत नसल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे.
जगभरात सध्या वापरात असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसींचा प्रभाव नव्या विषाणूमुळे कमी होईल असे म्हटले जात होते, त्याचे प्रत्यंतर आता येत असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
दिल्लीतील ओमायक्रॉन संक्रमितांची संख्या ३२०
दिल्लीत कोरोना व ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढत असून दिल्लीत ओमायक्रॉन संसर्ग झालेल्यांची संख्या शुक्रवारी ३२० वर पोहोचली आहे. गुरुवारी हा आकडा २६३ एवढा होता.
दिल्ली सरकारने सीलमपूर भागातील तीन बाजारपेठा बंद केल्या आहेत.
दिल्ली सरकारने निर्बंध लादले तरी बाजारांमधील गर्दी कमी झालेली नाही. कैनॉट प्लेस, सरोजिनीनगर, करोलबाग या भागातील बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून येत
आहे. दुकानदारांना सामाजिक सुरक्षिततेचे नियम पालन करण्याचे निर्देश दिले आहे.