Omicron : ऑक्सिजनपासून व्हेंटिलेटरपर्यंत... ओमायक्रॉनवर मात करण्यासाठी मोदी सरकारची काय आहे तयारी? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 05:56 PM2021-12-20T17:56:36+5:302021-12-20T17:57:18+5:30
Omicron variant : केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत सांगितले की, कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत काय तयारी केली आहे.
नवी दिल्ली : भारतातील 13 राज्यांमध्ये कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत देशात 161 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 54 प्रकरणे आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत सांगितले की, कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत काय तयारी केली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यसभेत सांगितले की, कोरोनाच्या येणाऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. ते म्हणाले, देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी एका दिवसात 2.5 कोटी लसीचे डोस देऊन इतिहास रचला आहे. ऑक्सिजनचा बफर स्टॉक तयार करण्यात आला आहे. याशिवाय, विविध राज्यांमध्ये 48 हजार व्हेंटिलेटर बसवण्यात आले आहेत, असे मनसुख मांडविया म्हणाले.
कोरोना महामारीवर मात करण्याच्या तयारीसाठी राज्यांना विशेष पॅकेज परवानगी दिली आणि ते राज्यांना दिले जात आहे, असे मनसुख मांडविया म्हणाले. याचबरोबर,पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे 88 टक्के लोकांना लसीचा एक डोस मिळाला आहे. तर 58 टक्के वयस्कर लोकांना लसीचा दुसरा डोस देखील मिळाला आहे. देशातील बहुतांश लोकांना लसीचा डोस मिळाला आहे, असे मनसुख मांडविया यांनी सांगितले.
देशात आतापर्यंत ओमायक्रॉनची 161 प्रकरणे
देशात आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरिएंटची 161 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आतापर्यंत, भारतातील 12 राज्यांमध्ये ओमायक्रॉनच्या व्हेरिएंटची पुष्टी झाली आहे. मात्र, भारतात ओमायक्रॉनची लागण झालेल्या कोणत्याही रुग्णाची प्रकृती चिंताजनक नाही, ही दिलासादायक बाब आहे. सर्वांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. तर आतापर्यंत 42 रुग्ण बरे झाले आहेत.
कोणत्या राज्यात किती ओमायक्रॉनची प्रकरणे?
महाराष्ट्र - 54
दिल्ली - 32
तेलंगणा - 20
राजस्थान - 17
गुजरात - 13
केरळ - 11
कर्नाटक - 8
उत्तर प्रदेश - 2
तामिळनाडू - 1
आंध्र - 1
पश्चिम बंगाल - 1
चंदीगड - 1
दिल्लीत प्रत्येक रुग्णाचे जीनोम सिक्वेन्सिंग होणार
ओमायक्रॉन व्हेरिएंटची वाढती प्रकरणे पाहता दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता दिल्लीत प्रत्येक कोरोना रुग्णाच्या नमुन्याचे जीनोम सिक्वेन्सिंग केले जाईल. आतापर्यंत, केवळ परदेशातून किंवा जोखीम असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले जात होते. यासोबतच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे बुस्टर डोसला मान्यता देण्याची मागणी केली.