ओमायक्रॉनची चिंता, केंद्राने दहा राज्यांमध्ये विशेष पथके पाठवली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 06:41 AM2021-12-26T06:41:54+5:302021-12-26T06:42:28+5:30
Omicron Variant In India: ही पथके राज्यांमध्ये तीन ते पाच दिवस तैनात राहतील आणि राज्याच्या आरोग्य अधिकार्यांशी जवळून काम करून परिस्थितीचे आकलन करतील आणि उपाययोजना सुचवतील.
नवी दिल्ली : ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दहा राज्यांमध्ये विशेष पथके पाठवली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले आहे की, ज्या 10 राज्यांमध्ये ओमायक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे आढळत आहेत आणि ज्याठिकाणी कोरोना लसीकरण कमी झाले आहे, त्याठिकाणी केंद्रीय पथके तैनात केली जात आहेत.
या राज्यांमध्ये केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोराम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाब यांचा समावेश आहे. ही पथके राज्यांमध्ये तीन ते पाच दिवस तैनात राहतील आणि राज्याच्या आरोग्य अधिकार्यांशी जवळून काम करून परिस्थितीचे आकलन करतील आणि उपाययोजना सुचवतील. तसेच, सार्वजनिक आरोग्य उपक्रमांचा अहवाल दररोज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारला देतील.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, केंद्रीय पथके विशेषत: मॉनिटरिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे नियंत्रण ऑपरेशन्स, तसेच जीनोम सिक्वेन्सिंगसाठी कोरोना चाचणीचे नमुने पाठवण्याचा निर्णय घेतील. याशिवाय, ते कोविड प्रोटोकॉलची अंमलबजावणी, रुग्णालयात खाटांची उपलब्धता, रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर, वैद्यकीय ऑक्सिजन, लॉजिस्टिक आणि लसीकरणाची उपलब्धता यासंदर्भात पाहणी करतील.
कोरोना रुग्णसंख्या एक लाखांपेक्षा कमी
देशात सक्रिय प्रकरणे सातत्याने एक लाखांपेक्षा कमी आहेत. गेल्या 24 तासात सक्रिय रुग्णांची संख्या 77,032 वर आली आहे. गेल्या 579 दिवसांतील हा नीचांक आहे. गेल्या 24 तासांत देशात 66,09,113 लोकांना लसीचे डोस देण्यात आले. देशात आतापर्यंत लसीचे 141 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.
दिल्लीत नवीन रुग्णांमध्ये 38 टक्क्यांनी
दिल्लीत 249 नवीन रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारच्या तुलनेत हे प्रमाण 38 टक्क्यांनी अधिक आहे. त्याच वेळी, मुंबईत संसर्ग 10 टक्क्यांनी वाढला आहे. येथे 683 नवीन रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे, कर्नाटकच्या कोलार मेडिकल कॉलेजमध्ये चार दिवसांत 30 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच, छत्तीसगडमधील रायगडमध्ये 13 शालेय विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.
15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी लसीकरण
सध्या देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. यामुळे सावध राहण्याची आवश्यकता आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांनी शनिवारी रात्री कोरोना पार्श्वभूमीवर देशाला संबोधित करताना सांगितले. यावेळी अद्याप कोरोना संपलेला नाही, त्यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी 3 जानेवारी 2022 पासून लसीकरणाला सुरुवात करत आहोत, अशी घोषणा त्यांनी केली. याशिवाय कोरोना वॉरियर्सनाही लसीचा बुस्टर डोस दिला जाणार असल्याचे नरेंद्र मोदींनी सांगितले.