Omicron Variant in India : देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांत वाढ, महाराष्ट्र सर्वांत जास्त प्रभावित राज्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 08:31 AM2021-12-16T08:31:28+5:302021-12-16T08:31:47+5:30
महाराष्ट्र, राजस्थान आणि दिल्लीत ओमायक्रॉन झपाट्याने पसरतो आहे.
विकास झाडे
नवी दिल्ली : देशातील ओमायक्रॉनच्या केसेस सातत्याने वाढत आहेत. देशात ओमायक्रॉन बाधितांची एकूण संख्या आता ५८ झाली आहे. महाराष्ट्र, राजस्थान आणि दिल्लीत ओमायक्रॉन झपाट्याने पसरतो आहे.
भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५८ झाली आहे. महाराष्ट्र सर्वात जास्त प्रभावित राज्य आहे आणि आतापर्यंत एकूण २८ प्रकरणे नोंदविली गेली आहेत. राजस्थान १३ प्रकरणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय गुजरात (४), कर्नाटक (३), केरळ (१), आंध्र प्रदेश (३) आणि दिल्ली (६) येथे रुग्ण आहेत.
कोरोनावरील लस निर्माण करणाऱ्या जगातील आघाडीच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असलेल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला ५०३ कोटींचा निधी देणार आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ, अस्ट्रेझेनेका आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्यातील सहकार्यावर ही मदत आधारित आहे.
कोरोनाचे ६,९८४ रुग्ण, मृत्यू २४७
देशात बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ६,९८४ रुग्ण आढळले, तर २४७ जणांचा मृत्यू झाला. देशात कोरोना विषाणूमुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या ४,७६,१३५ झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.
उपचाराधीन रुग्णांची संख्या ८७,५६२ आहे. सलग ४८ दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या ही १५ हजारांच्या आत राहिली आहे. गेल्या २४ तासांत उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत १,४३१ ची घट झाली, असेही निवेदनात म्हटले आहे.