Omicron News: ओमायक्रॉनमुळे तिसरी लाट कधी येणार? केव्हा टोक गाठणार? तज्ज्ञांनी आकड्यांसह सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 05:22 PM2021-12-06T17:22:51+5:302021-12-06T17:25:09+5:30
Omicron News: देशात आतापर्यंत ओमायक्रॉनच्या २१ रुग्णांची नोंद; ४० हून अधिक देशांत शिरकाव
नवी दिल्ली: कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं जगाची झोप उडवली आहे. भारतात आतापर्यंत ओमायक्रॉनचे २१ रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत ४० हून अधिक देशांमध्ये ओमायक्रॉननं शिरकाव केला आहे. यामुळे अनेकांची चिंता वाढली आहे. ओमायक्रॉन किती धोकादायक, त्यामुळे तिसरी लाट येणार का, आल्यास ती किती धोकादायक असणार, असे अनेक प्रश्न कोट्यवधी लोकांना पडले आहेत. मेदांताचे चेअरमन डॉ. नरेश त्रेहान यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
देशात आलेल्या कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासून आपण योग्य ते धडे घ्यायला हवेत, असं त्रेहान यांनी सांगितलं. 'पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान जवळपास ३२ आठवड्यांचं अंतर होतं. पहिली लाट गेल्यावर लोक निर्धास्त झाले. त्यानंतर दुसरी लाट आली आणि पहिल्या लाटेपेक्षा कैकपट भयानक होती. त्यामुळे यातून बोध घेत लोकांनी सतर्क राहायला हवं,' असं त्रेहन म्हणाले.
'ओमायक्रॉन व्हेरिएंट सप्टेंबर-ऑक्टोबरपासूनच पसरत होता. मात्र अद्याप तरी त्याचे पुरावे सापडलेले नाहीत,' असं त्रेहन यांनी सांगितलं. 'पहिल्या आणि दुसऱ्या लाटेवेळी वापरण्यात आलेल्या सूत्रा मॉडेलचा विचार केल्यास, नवा व्हेरिएंट जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात टोक गाठेल. फेब्रुवारीपर्यंत लाट ओसरू लागेल. ही लाट किती टोक गाठेल याचं उत्तर आपल्या वर्तनावर ठरतं,' अशी माहिती त्यांनी दिली.
देशातील सध्याची परिस्थिती पाहता देशात आता तरी व्यापक लॉकडाऊन लावण्याची गरज नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. लोकांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. मास्क घालूनच बाहेर निघायला हवं. गर्दीची ठिकाणं टाळायला हवीत. आवश्यक नसलेली ठिकाणं बंद केली जाऊ शकतात. नाईट क्लबसारखी ठिकाणं आता बंद केल्यास ते योग्य ठरेल, असं डॉक्टर म्हणाले.