Omicron Variant : "पॅरासिटेमॉल, मल्टी व्हिटॅमिन्सच्या गोळ्यांनी ओमायक्रॉनचे रुग्ण होताहेत बरे"; डॉक्टरांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 04:10 PM2021-12-24T16:10:23+5:302021-12-24T16:20:43+5:30
Omicron Variant : वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉनने आता लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. देशातील ओमायक्रॉनचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत.
नवी दिल्ली - कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर टाकली आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6,650 नवे रुग्ण आढळले आहेत तर 374 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,79,133 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉनने आता लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. देशातील ओमायक्रॉनचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. याच दरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे. "पॅरासिटेमॉल आणि मल्टी व्हिटॅमिन्सच्या गोळ्या खाऊन ओमायक्रॉनचे रुग्ण बरे होत आहेत" असा दावा डॉक्टरांनी केला आहे.
दिल्लीमधील लोक नायक जयप्रकाश रुग्णालयामध्ये (एलएनजेपी) उपचार घेत असणाऱ्या ओमायक्रॉनबाधितांवर सध्या पॅरासिटेमॉल आणि मल्टी व्हिटॅमिन्स या गोळ्यांच्या सहाय्याने उपचार केले जात आहेत. या रुग्णावर सुरू असणाऱ्या उपचारासंदर्भात रुग्णालयातील डॉक्टरांनी माहिती दिली. दिल्ली सरकारच्या सर्वात मोठ्या रुग्णालयामध्ये आतापर्यंत 40 ओमायक्रॉनबाधित रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. यापैकी 19 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.
"90 टक्के रुग्णांमध्ये कोणतीच लक्षणं नाहीत"
एलएनजेपी रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी 90 टक्के रुग्णांमध्ये कोणतीच लक्षणं दिसून येत नाहीत. उर्वरित 10 टक्के रुग्णांना घशात खवखव, थोडा ताप आणि अंगदुखीचा त्रास यासारखी सौम्य लक्षणं दिसत आहेत. "ओमायक्रॉनच्या या रुग्णांना उपचारादरम्यान केवळ मल्टी व्हिटॅमिन आणि पॅरासिटेमॉलच्या गोळ्यांचा वापर करण्यात आला आहे. या रुग्णांना इतर कोणत्याही गोळ्या देण्याची गरज आम्हाला जाणवली नाही" असं देखील डॉक्टरांनी म्हटलं आहे. दिल्लीतील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या जास्त आहे.
कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची बाधा झालेले जवळजवळ सर्वच रुग्ण हे परदेशातून आलेले आहेत, असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं. यापैकी सर्वच रुग्णांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर तीन चतुर्थांश व्यक्तींनी कोरोना लसीचा बुस्टर डोसही घेतला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे एकूण 67 रुग्ण आढळले असून त्यापैकी 23 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तामिळनाडूमध्ये 33, तेलंगणात 14, कर्नाटकात 12, केरळमध्ये 5 नवे रुग्ण आढळल्याने या विषाणूच्या रुग्णांची एकूण संख्या 325 वर पोहोचली. ओमायक्रॉन 16 राज्ये, केंद्रशासित राज्यांमध्ये पसरला आहे. महाराष्ट्रात नवे 23 रूग्ण आढळल्याने ओमायक्रॉन बाधितांचा आकडा 88 इतका आहे.