Omicron Variant: केंद्राच्या निर्देशानंतर राज्य सरकारांनी वाढवले नियम, अशी असेल नियमावली...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 09:34 AM2021-11-28T09:34:27+5:302021-11-28T09:47:15+5:30
नरेंद्र मोदींनी अधिकाऱ्यांना सर्व राज्यांमधील ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नवी दिल्ली:जगभरात अनेक देशांमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आढळून येत आहे. 'ओमीक्रॉन' असे या नवीन व्हेररिएंटला नाव देण्यात आले आहे. हा नवीन व्हेरिएंट आढळल्यानंतर केंद्राने चिंता व्यक्त केली आहे. तसेच, राज्य सरकारांनीही खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि केरळ या राज्यांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नियम आणखी कडक केले आहेत. या प्रवाशांना राज्यात प्रवेश करताना RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. याशिवाय, यासोबतच देशाची राजधानी दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना याबाबत कठोर भूमिका घेण्यास सांगितले आहे.
पीएम मोदींची दोन तास बैठक, अधिकाऱ्यांना दिले निर्देश
- मोदींनी अधिकाऱ्यांना राज्यांमधील ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा आढावा घेण्यास सांगितले.
- कोरोनाच्या काळात औषधांचा तुटवडा होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचना.
- ज्या भागात जास्त प्रकरणे येत आहेत, तेथे पाळत ठेवणे आणि काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करणे.
- ओमीक्रॉन प्रकारांवरील संशोधन वाढवावे आणि लोकांना नवीन प्रकारांबद्दल जागरूक करावे.
- आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा आढावा घ्यावा आणि लसीकरण वेगाने वाढवावे.
- कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसची व्याप्ती वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
- मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगसारख्या गोष्टींचे योग्य पालन करण्याच्या सूचना.
महाराष्ट्र
राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी भारत सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ज्या प्रवाशांना लसीचे दोन डोस मिळाले आहेत किंवा RT-PCR चाचणी 72 तासांच्या आत झाली आहे अशा प्रवाशांना राज्यात प्रवास करण्याची परवानगी आहे. नियमांचे पालन न केल्यास दंडही आकारला जाईल. कोरोनाचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस झालेल्यांनाच रिक्षा, टॅक्सी, बस, कॅब अशा सर्व सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करता येणार आहे. आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वेळा कोरोनाच्या आधीप्रमाणे करण्याची मुभा स्थानिक प्राधिकरणांना असेल. परंतु पूर्णत: लसीकरण केलेल्यांनाच नियमांचे पालन करून अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येईल.
कर्नाटक
कर्नाटक राज्याला ओमीक्रॉन व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका असल्याचे म्हटलं जात आहे, कारण मागील काही दिवसात आफ्रिकन देशातून बंगळुरुत एक हजारांपेक्षा जास्त लोक आले आहेत. दरम्यान, एसडीएम कॉलेजमध्ये कोविड स्फोटानंतर कर्नाटकने आधीच नवीन कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यातच 'ओमीक्रॉन'च्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. विमानतळांवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी अधिक तीव्र करण्यात आली आहे. परिपत्रकात असे म्हटले आहे की दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना आणि हाँगकाँग येथून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना कोविड चाचणी करावी लागेल आणि जे पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यांना 10 दिवस संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. गेल्या 15 दिवसांत या देशांतून राज्यात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रवाशांना RT-PCR चाचणी बंधनकारक असेल.
इतर अनेक राज्यात नियम कठोर
या नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारनेही विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला क्वारंटाईन केले जाणार आहे. तिकडे, मध्य प्रदेश सरकारही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. दरम्यान, केंद्राने व्यक्त केलेल्या चिंतेनंतर दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. रुग्णालयांनाही आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्यास सांगितले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी नुकत्याच उद्भवलेल्या आरोग्य परिस्थितीबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यांनी मुख्य सचिव, डीजीपी आणि आरोग्य सचिवांना कठोर नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.