Omicron Variant : डेल्टा विषाणूलाही मागे सोडू लागलाय ओमायक्रॉन; वाचा ओमायक्रोन विषाणू वेगाने का पसरतो?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 11:10 AM2021-12-17T11:10:35+5:302021-12-17T11:10:53+5:30
जगातील ७७ देशांमध्ये ओमायक्रॉन या नव्या विषाणूचा संसर्ग झाला आहे. हा विषाणू आता डेल्टा विषाणूलाही मागे सोडू लागला आहे.
जगातील ७७ देशांमध्ये ओमायक्रॉन या नव्या विषाणूचा संसर्ग झाला आहे. हा विषाणू आता डेल्टा विषाणूलाही मागे सोडू लागला आहे. लंडनमध्ये डेल्टा विषाणूचा संसर्ग झालेल्या लोकांपेक्षा ओमायक्रॉनचे रुग्ण अधिक आढळत आहेत. हा विषाणू एवढा वेगाने का पसरतो? त्याची लक्षणे काय? शरीरात कुठे-कुठे हा ओमायक्रॉन विषाणू हल्ला करतो? जाणून घेऊ या नव्या संशोधनात काय आढळले.
कसा अभ्यास केला?
- मानवाच्या श्वसननलिका आणि फुप्फुसांतील टिश्यू घेऊन त्यांना कोरोना विषाणूची लागण करून पाहिली.
- त्यासाठी आधीचा कोरोना विषाणू प्रकार, डेल्टा आणि आताचा ओमायक्रॉन असे तीन विषाणू वापरण्यात आले.
- संशोधकांनी केलेली ही पाहणी अद्याप प्रसिद्ध झाली नसली तरी त्यावर विविध तज्ज्ञांकडून विचार केला जात आहे. फुप्फुसांत जर ओमायक्रॉनची फारशी बाधा होत नसेल तर आधीसारखा तो घातक ठरणार नाही.
या अभ्यासात काय आढळले?
- ओमायक्रॉन हा विषाणू श्वसननलिकांमध्ये आधीच्या कोणत्याही विषाणूच्या तुलनेत ७० पट अधिक वेगाने पसरत आहे. २४ तासांत त्याचा प्रभाव झपाट्याने वाढत गेला.
- ४८ तासांनंतर हा ओमायक्रॉन विषाणू शरीरात मोठ्या प्रमाणात पसरत गेला. पण, या फुप्फुसांमध्ये या ओमायक्रॉनचा संसर्ग आधीच्या विषाणूच्या तुलनेत १० पट कमी दिसून आला.
धोका काय?
- ओमायक्रॉन वेगाने पसरत जाणार. त्यामुळे अधिकाधिक लोकांना बाधा होणार.
- इतर आजार असणाऱ्यांना ओमायक्रॉनची बाधा झाल्यास अधिक धोकादायक ठरू शकते.