Omicron News: टेन्शन वाढणार! भारतात ओमायक्रॉन वेगानं पसरणार; 'त्या' तज्ज्ञांची भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 11:59 AM2021-12-13T11:59:27+5:302021-12-13T11:59:56+5:30
Omicron News: देशातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडा ३८ वर; ६ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशांत आढळले रुग्ण
नवी दिल्ली: देशाच्या चिंतेत ओमायक्रॉननं भर घातली आहे. आतापर्यंत देशात ओमायक्रॉनचे ३८ रुग्ण आढळले आहेत. ६ राज्यं आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. त्यातच आता दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञानं केलेल्या भविष्यवाणीनं सगळ्यांची चिंता वाढली आहे.
भारतात ओमायक्रॉनचा फैलाव वेगानं होईल, असा अंदाज SACEMAच्या संचालिका ज्युलिएट पुलियम यांनी वर्तवला आहे. इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा अंदाज वर्तवला. भारतानं वाईटातल्या वाईट परिस्थितीचा सामना करण्याची तयारी ठेवायला हवी. ओमायक्रॉन आधीच्या व्हेरिएंटच्या तुलनेत कितीतरी अधिक वेगानं पसरत आहे. लसीकरण झालेल्या व्यक्तींनादेखील ओमायक्रॉनची लागण होत आहे, असं पुलियम यांनी सांगितलं.
दक्षिण आफ्रिकेत जे पाहायला मिळालं, ते आता जगातील इतर भागांत बघायला मिळतंय. भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंट वेगानं पसरेल, असं पुलियन म्हणाल्या. 'रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांना ओमायक्रॉन आधीच्या व्हेरिएंटप्रमाणेच आजारी पाडेल. ओमायक्रॉन लसीचा प्रभाव कमी करत आहे. फायझरचा बूस्टर डोस या व्हेरिएंटविरोधात थोडी सुरक्षा देतो, असं ब्रिटनमध्ये दिसून आलं आहे,' असं त्यांनी सांगितलं.
जागतिक आरोग्य संघटनेची चिंता वाढवणारी भविष्यवाणी
ओमायक्रॉन व्हेरिएंट कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा प्रभाव कमी करण्यास सक्षम आहे आणि तो वेगानं हातपाय पसरत आहे. डेल्टा बाधितांच्या संख्येपेक्षा ओमायक्रॉन बाधितांची संख्या लवकरच वाढेल. ओमायक्रॉन जास्त संक्रामक असल्यानं तो रुग्ण संख्येच्या बाबतीत डेल्टाला मागे टाकेल, असा अंदाज डब्ल्यूएचओनं वर्तवला आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वेगानं पसरतो. ओमायक्रॉनची लागण झाल्यानंतर लसीचा प्रभाव कमी होतो. ओमायक्रॉनच्या बाबतीत लक्षणं कमी दिसतात, अशी माहिती समोर आल्यानं वैद्यकीय विश्वाची काळजी वाढली आहे.