जिम ट्रेनर खुर्चीवर बसून आराम करत होता अन् एका हार्ट अटॅकनं क्षणार्धात सारं संपवलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 08:46 PM2022-10-19T20:46:51+5:302022-10-19T20:47:37+5:30
जिम ट्रेनर खुर्चीवर बसून आराम करत होता. अचानक त्याला हृदविकाराचा झटका आला आणि अवघ्या काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं.
गाझियाबाद:
जिम ट्रेनर खुर्चीवर बसून आराम करत होता. अचानक त्याला हृदविकाराचा झटका आला आणि अवघ्या काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. जिम ट्रेनरचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आदिल असं जिम ट्रेनरचं नाव असून तो ३३ वर्षांचा होता.
आदिल खुर्चीवर आराम करत असताना मंगळवारी रात्री ७ वाजताच्या सुमारात घडली. इमारतीमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाला आहे. जिम ट्रेनरला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आदिलच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून आदिल ताप असल्याची तक्रार करत होता. तरीही त्याने जिमला जाणे थांबवले नाही. आदिलला चार मुले असून या घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
त्यानं नुकतंच रिअल इस्टेट व्यवसायात पाऊल ठेवलं होतं आणि शालिमार गार्डनमध्ये ऑफीसही सुरू केलं होतं. आदिल त्याच्या ऑफिसमध्ये बसला होता तिथेच त्याला हृदयविकाराचा झटका आला.
याआधी मुंबईत देखील नवरात्रोत्सवादरम्यान गरबा खेळणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. विरार परिसरातील एका रहिवासी इमारतीत गरबा खेळत असताना ज्वेलरी डिझायनरनं अंग टाकलं. गेल्या महिन्यात जम्मूमध्ये एका कलाकाराचा परफॉर्मन्स सुरू असताना स्टेजवर कोसळून मृत्यू झाला होता. त्याचाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.