छोट्या भावाच्या निधनाची बातमी कळताच घरी निघालेल्या मोठ्या भावाचाही वाटेत मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 02:18 PM2022-12-09T14:18:47+5:302022-12-09T14:23:19+5:30
दिलीपच्या निधनाचं वृत्त घरच्यांना कळताच कुटुंबात शोक पसरला. घरच्यांनी या घटनेची माहिती कानपूरमध्ये राहणाऱ्या उमाशंकर गौंड या भावाला दिली
देवरिया - उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात काही तासांमध्ये २ सख्या भावांचा वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. छोटा भाऊ दुचाकीवरून निमंत्रण पत्रिका देऊन घरी परतत होता. तेव्हा बिहारच्या जीरदोई इथं रस्ते अपघातात त्याचा जीव गेला. ही बातमी कानपूरमध्ये मोठ्या भावाला कळाली. त्यानंतर तो कारमधून देवरियासाठी निघाला होता. छोट्या भावाच्या निधनाचं वृत्त समजताच मोठा भाऊ कानपूरहून देवरिया इथं घरी चालला असताना रस्त्यात त्याच्या कारचे टायर फुटले.
त्यामुळे कार अनियंत्रित झाली. या दुर्घटनेत मोठ्या भावाचाही मृत्यू झाला. त्यामुळे एकाच दिवशी या दोन सख्या भावांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला. या घटनेने गावकऱ्यांमध्येही शोककळा पसरली. बातमी ऐकून अनेकांचे डोळे पाणावले.
मिळालेल्या माहितीनुसार, छतरपूर गावातील दिवंगत भगिरथी गौंड यांना ५ मुले आहेत. त्यात रमाशंकर गौंड, उमाशंकर गौंड, गौरी गौंड, सीताराम गौंड आणि दिलीप गौंड यांचा समावेश आहे. मंगळवारी दिलीप गौंड गावातील मित्र रामकेवल शर्मासोबत दुचाकीवरून बिहार राज्यातील जीरदोई इथं निमंत्रण पत्रिका द्यायला गेला होता. रात्री उशिरा हे दोघे घरी परतताना विजयीपूर चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. दोघा जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. ज्याठिकाणी दिलीपला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर दिलीपसोबतच्या मित्रांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे.
दिलीपच्या निधनाचं वृत्त घरच्यांना कळताच कुटुंबात शोक पसरला. घरच्यांनी या घटनेची माहिती कानपूरमध्ये राहणाऱ्या उमाशंकर गौंड या भावाला दिली. त्याच रात्री उमाशंकर त्याच्या कुटुंबासह कारमधून देवरिया येथील घरी निघाला. परंतु ईश्वराच्या मनात भलतेच काही होते. उमाशंकर उन्नाव इथं पोहचला तेव्हा त्यांच्या कारचे टायर फुटले. त्यामुळे कार अनियंत्रित झाली आणि रस्त्याशेजारील खड्ड्यात पडली.
या अपघातात उमाशंकर गौंड यांचा मृत्यू झाला तर जखमी पत्नीला कानपूरच्या रुग्णालयात भरती केले आहे. या घटनेत ड्रायव्हरचा दुखापत झाली आहे. उमाशंकरच्या मृतदेहाचं कानपूरमध्ये पोस्टमोर्टम करण्यात आले. कुटुंबाने तिथेच अंत्यसंस्कार केले. तर बुधवारी रात्री दिलीपवरही कुटुंबाकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्व भावांमध्ये उमाशंकर हा दुसऱ्या नंबरचा होता. तो कानपूर इथं नोकरी करायचा. निवृत्तीनंतर तो तिथेच राहत होता. तर दिलीप गौंड सर्वात छोटा होता. देवरिया गावात तो मिठाई बनवण्याचं काम करत होता. त्यांच्या मुलीचं पुढील वर्षी लग्न होते. २ भावांच्या आकस्मित जाण्यानं कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे. गावातील सर्व लोकांमध्ये या दुर्घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.