परतीच्या प्रवासात नागपूरकरांना ‘ऑक्टोबर हिट’च्या झळा
By निशांत वानखेडे | Published: October 5, 2024 09:29 PM2024-10-05T21:29:21+5:302024-10-05T21:29:34+5:30
गेल्या सप्टेंबर महिन्यात २७ तारखेपासून पाऊस शांत झाला.
नागपूर : पावसाळी कार्यकाळ पूर्ण करून नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्रातूनही परतीचा प्रवास शनिवारीपासून सुरू केला. मान्सून परत जात असताना नागपूरकरांना मात्र पहिल्या दिवशीपासून ऑक्टोबर हिटच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. शनिवारी सायंकाळी अचानक आलेल्या हलक्या सरींनी थोडासा दिलासा दिला. हवामान खात्याने ८ व ९ ऑगस्ट रोजी नागपूरसह विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता वर्तवली आहे.
गेल्या सप्टेंबर महिन्यात २७ तारखेपासून पाऊस शांत झाला. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात उन्हाच्या झळांनी नागपूरकरांना बेजार केले. पहिल्या तारखेपासून पारा चांगलाच तापत आहे. सरासरीपेक्षा ३.२ अंशाने वाढत तापमान ३६.४ अंशावर पोहचले होते. त्यामुळे प्रचंड उकाड्याचा त्रास नागपूरकरांना होत आहे. शनिवारी सायंकाळी अचानक वातावरण बदलले आणि हलक्या सरीही झाल्याने थोडासा दिलासा मिळाला. मात्र दिवसभर उकाड्याने हैराण केले. शनिवारचे तापमान ३५.६ अंशावर होते. अकोल्यात पारा सर्वाधिक ३५.८ अंशावर होता.
दरम्यान ठरलेल्या अंदाजानुसार ५ ऑक्टोबरपासून मान्सूनने महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू केला आहे. तत्पूर्वी अरबी समुद्राच्या बऱ्याचशा भागातून मान्सूनने गाशा गुंडाळला. शनिवारी मान्सनूची परतीची लाईन नंदूरबार व नवसारी या भागातून गेली. हळूहळू करीत १० ऑक्टाेबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सूनचा यंदाचा प्रवास संपेल, असा अंदाज आहे.