पुन्हा एकदा एक्झिट पोलची फजिती
By Admin | Published: March 12, 2017 01:06 AM2017-03-12T01:06:57+5:302017-03-12T01:06:57+5:30
प्रत्यक्ष मतदान केलेल्या मतदारांचा कल जाणून शास्त्रोक्त पद्धतीने घेतली जाणारी मतदानोत्तर चाचणी (एक्झिट पोल) विदेशात अतिशय विश्वासार्ह समजली जात
- प्रेमदास राठोड
प्रत्यक्ष मतदान केलेल्या मतदारांचा कल जाणून शास्त्रोक्त पद्धतीने घेतली जाणारी मतदानोत्तर चाचणी (एक्झिट पोल) विदेशात अतिशय विश्वासार्ह समजली जात असताना भारतात मात्र एक्झिट पोलची केवळ फजितीच बघावयास मिळत आहे. आज आलेले पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि एक्झिट पोलचे अंदाज यात कुठेही ताळमेळ बसत नाही. गेल्या दोन दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले एक्झिट पोलचे अंदाज आजच्या निकालानंतर पूर्णत: फोल ठरले आहेत.
मतदानापूर्वी वेळोवेळी केलेल्या सर्वेक्षणाचे अंदाज अनेकदा प्रत्यक्ष निकालाच्या कसोटीवर उतरतीलच याचा नेम नसतो. पण एकदा मतदान झाल्यानंतर मतदारांचा जाणून घेतलेला कल म्हणजे एक्झिट पोल प्रत्यक्ष निकालाच्या जवळपास जाणारे हवेत.
एक्झिट पोलचे अंदाज आणि प्रत्यक्ष निकाल यात फारतर ५ टक्के तफावत असायला हवी. आजच्या निकालानंतर मात्र एक्झिट पोलचे अंदाज धड ५ टक्केही खरे ठरलेले नाहीत.
भाजपाच्या झोळीत आले भरपूर
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या घवघवीत यशामुळे इतर पक्षांची पार झोपमोड झाली आहे. या राज्यात एक्झिट पोल घेतलेल्या संस्थांपैकी ‘इंडिया टुडे’ने भाजपाला २७९ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला होता. इतर संस्थांनी १५५ ते २१०पेक्षा जास्त जागा भाजपाला दिल्या नव्हत्या. येथील मतदारांनी मात्र भाजपाच्या झोळीत तब्बल ३१२ जागा दिल्या. येथे सपा, बसपा व इतर पक्षांबाबतचे एक्झिट पोलचे अंदाजही साफ आपटले. सत्ताधारी समाजवादी पार्टी - काँग्रेस आघाडीला ८८ ते १६९ जागा मिळतील हा एक्झिट पोलचा अंदाज खोटा ठरला. या आघाडीला येथे फक्त ५४ जागांवर समाधान मानावे लागले. बसपाच्या सुमार कामगिरीने तर एक्झिट पोलची फजिती केली आहे. सर्व संस्थांच्या एक्झिट पोलने बसपाला २८पेक्षा जास्त व कमाल ९३ जागा मिळतील, असा दावा केला होता. प्रत्यक्षात बसपाला फक्त १९ जागा मिळाल्या. उर्वरित लहान लहान अर्थात इतर पक्षांबाबतचे एक्झिट पोलचे अंदाजही नापास ठरले.
विश्वासार्हतेवर
मोठे प्रश्नचिन्ह
मणिपुरात एक्झिट पोलचे अंदाज चुकले. ‘इंडिया टुडे अॅक्सिस’चे अंदाज निकालाच्या जवळपास जाणारे होते. या संस्थेने भाजपाला १६ ते २२ जागा मिळतील, असे म्हटले होते. भाजपाला येथे २१ जागा मिळाल्या. इंडिया टीव्ही सी-व्होटरने येथे काँग्रेसला किमान १७ जागा दिल्या होत्या तर इंडिया टुडे एक्झिट पोलने ३०पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात येथे काँग्रेसला २८ जागा मिळाल्या. प्रत्यक्ष मतदान केलेल्या मतदारांचा कल जाणून केलेले एक्झिट पोलचे अंदाज, त्याच मतदारांनी दिलेल्या कौलाने खोटे ठरल्यामुळे एक्झिट पोलच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे.
‘आप’विषयीचे निष्कर्ष फसले
पंजाबातही एक्झिट पोलचे अंदाज निकालाच्या जवळपासही फिरकू शकले नाहीत. सत्ताधारी अकाली दल-भाजपा आघाडीला ४ ते १३ जागा मिळतील, असा अंदाज होता. पण प्रत्यक्षात या आघाडीला १८ जागा मिळाल्या. काँग्रेसबाबतचे फक्त ‘इंडिया टुडे अॅक्सिस’चे अंदाज निकालाच्या जवळपास जाणारे ठरले. इंडिया टुडेच्या एक्झिट पोलने काँग्रेसला येथे जास्तीतजास्त ७१ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला होता. येथे काँग्रेसला प्रत्यक्षात ६ जागा जास्त म्हणजेच ७७ जागा मिळाल्या. पंजाब विधानसभेत २० आमदारांसह हजेरी लावण्यात यशस्वी ठरलेल्या आम आदमी पार्टीला तर सर्व एक्झिट पोलने हरभऱ्याच्या झाडावर नेऊन ठेवले होते. पुढील सरकार आम आदमी पार्टीचेच असा दावा करणारे सर्व एक्झिट पोल येथील मतदारांनी फेल ठरवले. येथे आपला ४२ ते ६७ जागा मिळतील, असा एक्झिट पोलचा अंदाज होता. प्रत्यक्ष फक्त २० जागा मिळाल्या.
गोव्यातही खाल्ला सपाटून मार
गोव्यात तर सत्ताधारी भाजपासोबतच एक्झिट पोलही सपाटून आपटले. येथे एक्झिट पोल घेतलेल्या एकाही संस्था भाजपाला १५पेक्षा कमी आणि काँग्रेसला १८पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नव्हत्या. प्रत्यक्ष निकालानंतर या लहानशा विधानसभेत सत्ताधारी भाजपा जेमतेम १३ जागांपर्यंत मजल मारू शकली. काँग्रेसने मात्र सर्वांचे अंदाज चुकवून १७ जागा पटकावल्या. गोव्यातही आम आदमी पार्टीचा उदोउदो करण्यात एक्झिट पोल घेणाऱ्या संस्थांमध्ये स्पर्धा लागली होती. येथील अंदाजात संख्येमध्ये शून्य ते २, ४, ७ असे नमूद केल्यामुळे एक्झिट पोलची थोडीफार विश्वासार्हता राहिली. गोव्यात सरकार स्थापणारच असा प्रण घेऊन कामाला लागलेल्या ‘आप’ला भोपळाही फोडता आला नाही.
मतदारांनी ठरवले एक्झिट पोल खोटे
उत्तराखंडातही एक्झिट पोलचे सर्व अंदाज मतदारांनी खोटे सिद्ध केले. येथे भाजपाला एकाही एक्झिट पोलने ५३पेक्षा जास्त जागा दिल्या नव्हत्या. प्रत्यक्षात येथे भाजपाने ५७ जागा पटकावून शानदार विजय मिळवला. काँग्रेसच्या कामगिरीने येथे एक्झिट पोलची खूप निराशा केली. सत्ताधारी काँग्रेसला येथे फक्त ११ जागांवर समाधान मानावे लागले.