पुन्हा सिरमचा 'मास्टर स्ट्रोक'; कोरोना प्रतिबंधक 'कोव्होव्हॅक्स' लस जूनपर्यंत बाजारात येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 20:12 IST2021-01-30T20:07:42+5:302021-01-30T20:12:33+5:30
ब्रिटनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या मानवी चाचण्यांमध्ये कोव्होव्हॅक्स लसींची परिणामकारकता ८९.३ टक्के इतकी असल्याचे सिद्ध झाले आहे.

पुन्हा सिरमचा 'मास्टर स्ट्रोक'; कोरोना प्रतिबंधक 'कोव्होव्हॅक्स' लस जूनपर्यंत बाजारात येणार
पुणे : नोव्हाव्हॅक्स आणि सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया यांनी विकसित केलेल्या लसीची परिणामकारकता प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. भारतात या लसीच्या चाचण्या सुरू करण्यासंदर्भात अर्ज करण्यात आला आहे, अशी माहिती अदर पुनावाला यांनी शनिवारी ट्विट करून दिली. जून २०२१ पर्यंत 'कोव्होव्हॅक्स'च्या प्रत्यक्ष वापराला सुरुवात होईल, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
नोव्हाव्हॅक्स या अमेरिकी कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसीबाबतचे संशोधन व उत्पादन करण्याबाबत त्या कंपनीने सिरम इन्स्टिट्यूटशी ऑगस्ट २०२० मध्ये करार केला आहे. नोव्हाव्हॅक्स कंपनीच्या लसीचे भारतात उत्पादन करण्याचा विशेष हक्क या कराराद्वारे सिरम इन्स्टिट्यूटला प्राप्त झाला. उच्च मध्यम किंवा उच्च उत्पन्न असलेले देश वगळता अन्य देशांसाठी कोरोना साथीच्या काळात सिरम इन्स्टिट्यूटला नोव्हाव्हॅक्स लसीचे उत्पादन करण्याचा हक्क या कराराद्वारे मिळाला. सर्व परवानग्या मिळून चाचण्या सुरळीत पार पडल्यास कोव्होव्हॅक्स ही भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळणारी तिसरी लस असेल. याआधी अँस्ट्रेझेनिका या कंपनीची कोव्हीशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅकसिनला परवानगी मिळाली आहे.
ब्रिटनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या मानवी चाचण्यांमध्ये कोव्होव्हॅक्स लसींची परिणामकारकता ८९.३ टक्के इतकी असल्याचे सिद्ध झाले आहे. यामध्ये १८ ते ८४ या वयोगटातील १५ हजार स्वयंसेवकांवर लसीची चाचणी घेण्यात आली आणि त्याचे निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आले. कोरोनाच्या नवीन स्ट्रेनवरही ही लस प्रभावी असल्याचे विविध संशोधनातून सिद्ध झाले आहे.