देशातील महाविद्यालयांमध्ये दीड लाख बोगस प्राध्यापक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 06:00 AM2020-01-29T06:00:00+5:302020-01-29T06:00:12+5:30
काही महाविद्यालयांमध्ये आणखी प्राध्यापक नियमबाह्य पद्धतीने कार्यरत
पुणे : देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये केलेल्या तपासणीत सुमारे दीड लाख प्राध्यापक बोगस असल्याचे आढळून आले असून, काही महाविद्यालयांमध्ये आणखी प्राध्यापक नियमबाह्य पद्धतीने कार्यरत असण्याची शक्यता आहे. परंतु, लवकरच त्यांचीही तपासणी केली जाईल, असे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी मंगळवारी सांगितले.
सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित ‘डेस्टिनेशन इंडिया’ या कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. सहस्त्रबुद्धे बोलत होते. ते म्हणाले, की ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने (एआयसीटीई) सलग तीन वर्ष कमी प्रवेश झालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांची प्रवेशक्षमता निम्म्यावर आणली आहे. सुमारे १७ लाखांपर्यत वाढलेली अभियांत्रिकीची प्रवेशक्षमता १४ लाख ५० हजारांपर्यत कमी झाली आहे. पुढील काळात ही प्रवेशक्षमता १४ लाखांपर्यत आणण्याचे नियोजन आहे. विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे महाविद्यालयांनी प्राध्यापकांची संख्याही कमी केली आहे. तसेच, काही महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांना कमी वेतन मिळत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे.
डॉ. सहस्त्रबुद्धे म्हणाले, की अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांनी विद्यार्थी व प्राध्यापकांची खोटी माहिती एआयसीटीईला दिली होती. प्राध्यापकांच्या माहितीची पडताळणी पॅनकार्ड आणि इतर शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे केल्यानंतर सुमारे साडेसहा लाख प्राध्यापकांपैकी दीड लाख प्राध्यापक बोगस निघाले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन रोजगाराच्या संधी शोधणारे विद्यार्थी आणि उपलब्ध रोजगाराच्या संधी यांच्यामध्ये ताळमेळ ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे एआयसीटीईकडून नव्या अभियांत्रिकी महाविद्यालयांबरोबरच औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र या विद्याशाखांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांना मान्यता दिली जात नाही.
देशातील औषधनिर्माणशास्त्र आणि व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखांच्या महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या चांगली आहे. त्यामुळे या शैक्षणिक संस्थांकडून संबंधित विद्याशाखांचे नवीन महाविद्यालय सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव येत आहे. परंतु, नव्या महाविद्यालयांना मान्यता दिल्यास या विद्याशाखांची परिस्थिती अभियांत्रिकी विद्याशाखेसारखी होऊ शकते, असेही सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.