विटंबनेच्या आरोपावरून मारहाणीत एकाचा मृत्यू; पंजाबमध्ये चोवीस तासांत दोन घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 05:40 AM2021-12-20T05:40:30+5:302021-12-20T05:41:04+5:30
पंजाबच्या कपूरथळात विटंबनेच्या आरोपावरून रविवारी पहाटे झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला.
बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क
चंदीगड :पंजाबच्या कपूरथळात विटंबनेच्या आरोपावरून रविवारी पहाटे झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. एक दिवस आधी (शनिवार) अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिरात विटंबनेच्या आरोपावरून झालेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाला होता. कपूरथळा जिल्ह्यातील निजामपूर गावात गुरुद्वारा साहिबच्या निशान साहिबमध्ये रविवारी पहाटे चार वाजता विटंबनेचा प्रयत्न झाला. गुरुद्वारा साहिबमध्ये संगतने एका व्यक्तीला विटंबना करताना पाहिल्यावर त्याला पकडून मारहाण झाली. गुरुद्वाराजवळच्या पोलीस चौकीतील पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांच्या ताब्यातून आरोपीला सोडवून एका खोलीत बंद केले. संतापलेल्या लोकांनी खिडकी तोडून पोलिसांसमोरच आरोपीला मारून टाकले. परिस्थिती पाहून पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला.
एसएसपी हर कमल प्रीतसिंह यांचे म्हणणे आरोपी चोरीच्या उद्देशाने गुरुद्वारात आला होता, तर संगतचा दावा असा की, आरोपीने पकडले गेल्यानंतर सांगितले की, विटंबनेसाठी ९ जणांची तुकडी दिल्लीहून आली आहे. मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.