अंधांसाठी आता एका क्लिकवर ‘सुगम्य पुस्तकालय’

By admin | Published: August 25, 2016 04:58 AM2016-08-25T04:58:41+5:302016-08-25T04:58:41+5:30

दोन लाख पुस्तके उपलब्ध असलेल्या ‘सुगम्य पुस्तकालय’ या अंधांसाठीच्या आॅनलाइन ग्रंथालयाचा केंद्र सरकारने बुधवारी शुभारंभ केला.

One click on 'Easy Library' for the blind | अंधांसाठी आता एका क्लिकवर ‘सुगम्य पुस्तकालय’

अंधांसाठी आता एका क्लिकवर ‘सुगम्य पुस्तकालय’

Next


नवी दिल्ली: डोळ््यांनी वाचण्याखेरीज अन्य ज्ञानेंद्रियांनी आस्वाद घेता येईल, अशा स्वरूपातील दोन लाख पुस्तके उपलब्ध असलेल्या ‘सुगम्य पुस्तकालय’ या अंधांसाठीच्या आॅनलाइन ग्रंथालयाचा केंद्र सरकारने बुधवारी शुभारंभ केला. दिव्यांगांनाही (अपंग) जीवनाच्या सर्व क्षेत्रांत समान संधी मिळावी, यासाठी राबविल्या जात असलेल्या ‘सुगम्य भारत’ या योजनेचा एक भाग म्हणून व ‘डिजिटल इंडिया’मध्ये या लोकांनाही सामावून घेण्यासाठी हा ऐतिहासिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी या पुस्तकालयाचा शुभारंभ केला. ते म्हणाले की, ‘आजच्या युगात माहिती व तंत्रज्ञान या दोन्ही मोठ्या शक्ती आहेत. त्या दृष्टीने अंध आणि इतर यांच्यातील ‘डिजिटल’ दरी या पुस्तकालयाने दूर होईल. ‘नॅशन इन्फर्मेटिक्स सेंटर’ने (एनआयसी) भारत सरकारच्या १०० वेबसाइट दिव्यांगस्नेही करण्याचे काम हाती घेतले असून, १९ वेबसाइट आत्तापर्यंत त्या दृष्टीने तयार करण्यात आल्या आहेत,’ अशी माहितीही त्यांनी दिली.
सामाजिक न्याय व सबलीकरणमंत्री थावरचंद गेहलोत यांनी ‘सुगम्य भारत’ योजनेखाली हाती घेतलेल्या कामांची माहिती दिली. यात अनेक शहरांमधील सरकारी इमारती दिव्यांगस्नेही करणेस सहा लाख दिव्यांगांना केलेले उपयुक्त साधनांचे वाटप, १८ नव्या ब्रेल छापखान्यांना दिलेली मंजुरी, तिरुवनंतपूरम येथील दिव्यांग महाविद्यालयाचे विद्यापीठात रूपांतर इत्यादींचा समावेश होता. मानवसंसाधन विकासमंत्री प्रकाश जावडेकर आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचीही या वेळी भाषणे झाली. ‘सुगम्य पुस्तकालय’ हा दृष्टिहीनांना डोळ््यांनी न वाचताही अन्य स्वरूपात आकलन होईल, अशा स्वरूपातील लिखित साहित्याच्या जगभरातील साहित्याचे संकलन असलेला ‘आॅनलाइन प्लॅटफॉर्म’ आहे. सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाने ‘डेसी फोरम आॅफ इंडिया’च्या सदस्य संघटनांच्या मदतीने व टीसीएस अ‍ॅसेस तंत्रज्ञानाने हे पुस्तकालय तयार केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>वाचक सहायकाची गरज नाही
आता कोणाही दृष्टिहीन व्यक्तीस एखादे पुस्तक ‘वाचायचे’ असेल, तर ते वाचून दाखविण्यास किंवा स्कॅन करून देण्यास त्यांना इतर कोणाचीही मदत घेण्याची गरज भासणार नाही. ‘सुगम्य पुस्तकालया’च्या साइटवर एका क्लिकमध्ये पुस्तक मिळेल.
त्याला हे पुस्तक मोबाइल फोन, टॅबलेट कॉम्प्युटर, डेसी प्लेअर किंवा ब्रेल अशा कोणत्याही माध्यमातून वाचता येतील. हवे असलेले पुस्तक डाउनलोड करायचे असेल, तर त्याला कोणत्याही ‘डीएफआय’ संघटनेच्या सदस्य संस्थेकडे सभासद म्हणून नोंदणी करावी लागेल. ज्यांच्याकडे ब्रेल छापखाने आहेत, अशा सदस्य संस्थांकडून त्याला हे पुस्तक ब्रेल लिपितही मागविता येईल.

Web Title: One click on 'Easy Library' for the blind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.