दिल्ली-रांची राजधानी एक्स्प्रेसचा एक डबा आणि इंजिन रूळावरून घसरलं; जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 12:45 PM2017-09-07T12:45:14+5:302017-09-07T13:07:04+5:30
दिल्ली-रांची राजधानी एक्सप्रेसचा एका डबा आणि इंजिन रूळावरून घसरलं असल्याची माहिती मिळते आहे.
नवी दिल्ली, दि. 7- एक्स्प्रेसचे डबे रूळावरून घसरण्याचं सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. गुरूवारी सकाळी उत्तर प्रदेशात सोनभद्रमध्ये शक्तीपुंज एक्स्प्रेसचे सात डबे रूळावरून घसरल्याची घटना घडली असताना नवी दिल्लीतही अपघात झाल्याचं वृत्त आहे. दिल्ली-रांची राजधानी एक्सप्रेसचा एका डबा आणि इंजिन रूळावरून घसरलं असल्याची माहिती मिळते आहे. रांचाहून दिल्लीला ही एक्स्प्रेस जात असताना अपघात झाल्याची माहिती समोर येते आहे. दिल्लीतील शिवाजी पुलाजवळ ही घटना घडली आहे. गुरूवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास हा अपघात झाल्याचं समजतं आहे. पण सुदैवाने कुठलिही जीवितहानी झालेली नाही.
Engine and Power car of Ranchi Rajdhani Express derail on Delhi's Shivaji Bridge. No injuries reported
— ANI (@ANI) September 7, 2017
एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरल्याची आजच्या दिवसातील ही दुसरी घटना आहे. आज सकाळी उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये सकाळी सहा वाजता रेल्वे अपघात झाला. हावडा-जबलपूर शक्तिपुंज एक्स्प्रेसचे सात डबे रूळावरून घसरले. उत्तर प्रदेशच्या सोनभद्र-ओबराच्या जवळ असलेल्या छपराकुंड स्टेशन जवळ हा अपघात झाला होता. पण सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झालेली नाही. रेल्वे रूळाला तडे गेल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून एक्स्प्रेसचे डबे रूळावरून घसरत असल्याच्या घटना घडत आहेत. रेल्वे अपघातांची जबाबदारी स्विकारत सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात आणि त्यानंतरच्या खातेवाटपात पियुष गोयल यांना रेल्वे मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशात उत्कल एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरुन अपघात; २३ ठार, ४0 जखमी
उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात खतौली येथे शनिवारी सायंकाळी पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरून घसरून २३ प्रवासी मृत्युमुखी पडले आणि ४0 हून अधिक जखमी झाले. उत्कल एक्स्प्रेस अपघात प्रकरणी 13 रेल्वे कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबन करण्यात आलेल्या कर्मचा-यांमध्ये कनिष्ठ अभियंत्याचाही समावेश आहे. निलंबित करण्यात आलेला कनिष्ठ अभियंता आणि हॅमरमॅन यांच्यासहित 11 कर्मचारी कोणतीही परवानगी न घेता अपघात झाला त्या ठिकाणी देखभाल आणि दुरुस्तीची कामे करत होते.
उत्तर प्रदेशमध्ये कैफियत एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरुन घसरुन अपघात, 74 प्रवासी जखमी
उत्तर प्रदेशातील आझमगडहून दिल्लीला रवाना झालेल्या कैफियत एक्स्प्रेसचा अपघात झाला असून एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरुन घसरले होते. उत्तर प्रदेशातील कानपूर आणि इटावा दरम्यान औरैया जिल्ह्यात 12225 (अप) कैफियत एक्स्प्रेसचा अपघात झाल. अछल्दा आणि पाता रेल्वे स्टेशनच्या दरम्यान मानवरहीत क्रॉसिंगजवळ रेल्वे फाटक आहे. या ठिकाणी फाटक क्रॉस करणा-या डंपरला कैफियत एक्स्प्रेसने धडक दिली. यावेळी कैफियत एक्स्प्रेसचे इंजिनसह दहा डबे रुळावरुन खाली घसरले. ही घटना रात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, या अपघातात त्यात ७४ प्रवासी जखमी झाले.
उत्तर प्रदेशात वाराणसीकडे जाणा-या मालगाडीचा अपघात, घसरले 4 डबे
अलाहाबादहून वाराणसीकडे जाणा-या मालगाडीचे चार डबे रुळावरुन घसरले होते. शनिवारी (2 सप्टेंबर) संध्याकाळी ही दुर्घटना घडली. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वाराणसीजवळ असलेल्या हरदत्तपूर रेल्वे स्टेशन परिसरात या मालगाडीचे चार डबे घसरले. या अपघातानंतर वाराणसी-अलाहाबाद मार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः ठप्प झाला होता. यामुळे अन्य गाड्यांचे वेळापत्रक कोलमडलं. या दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.