एक कोटी रुपये, नीलगायीचे ११७ किलो मांस, ४० बंदुका जप्त
By admin | Published: May 1, 2017 03:52 AM2017-05-01T03:52:58+5:302017-05-01T03:52:58+5:30
लष्करातील सेवानिवृत्त कर्नलच्या घरातून एक कोटी रुपये रोख, नीलगायीचे ११७ किलो मांस, प्राण्यांची कातडी, हस्तिदंत, ४० बंदुका
मिरत : लष्करातील सेवानिवृत्त कर्नलच्या घरातून एक कोटी रुपये रोख, नीलगायीचे ११७ किलो मांस, प्राण्यांची कातडी, हस्तिदंत, ४० बंदुका व इतरही अनेक आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. महसूल गुप्तचर संचालनालय व वन विभागाने १७ तास ही कारवाई केल्यानंतर खळबळ उडाली आहे.
शनिवारी दुपारी सेवानिवृत्त कर्नल देवींद्र कुमार यांच्या घरावर छापा मारण्यात आला. ही कारवाई रविवारी पहाटे ३.३० वाजेपर्यंत चालली. विशेष म्हणजे कुमार यांचे पुत्र प्रशांत बिश्नोई हे राष्ट्रीय स्तरावरील निशाणेबाज आहेत.
छापा मारणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. कुमार यांच्या घरातील एका गोदामामध्ये एक कोटी रुपये, ११७ किलो मांस, ४० बंदुका, हरणाच्या पाच कवट्या, सांभराचे शिंग, काळे हरिण व चिंकाराचे शिंग, प्राण्यांची कातडी व हस्तिदंत जप्त करण्यात आले.
वनांचे प्रमुख संरक्षक मुकेश कुमार यांनी सांगितले की, नीलगायीचे मांस फ्रीजमध्ये ठेवले होते. त्याचे नमुने परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहेत. कुमार व त्यांच्या पुत्राविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायदा-१९७२ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. कुमार हे पत्नी संगीता व पुत्र प्रशांत ऊर्फ पाशासमवेत येथे राहतात. छापा मारल्याची खबर येताच प्रशांत फरार झाला.