एक कोटी बँकधारकांचा डाटा लीक, किंमत फक्त 10 पैसे
By admin | Published: April 14, 2017 08:58 AM2017-04-14T08:58:27+5:302017-04-14T09:30:21+5:30
देशातील एक कोटी बँकधारकांच्या खात्याची माहिती लीक झाली असून विकली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - देशातील एक कोटी बँकधारकांच्या खात्याची माहिती लीक झाली असून विकली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बँक खात्यांशी संबंधित ही खासगी माहिती अत्यंत कमी दरात विकली जात आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात फक्त 10 ते 20 पैशांमध्ये तुमच्या खात्याशी संबंधित माहिती विकली जात असल्याचं समोर आलं आहे.
दिल्लीतील ग्रेटन कैलास येथे राहणा-या 80 वर्षीय महिलेच्या तक्रारीनंतर तपास करत असताना हा पर्दाफाश झाला आहे. महिलेच्या क्रेडिट कार्डमधून 1.46 लाख रुपये गायब झाले होते. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी बँक खात्यांची माहिती पुरवणा-या मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. यानुसार बँकेत काम करणारे कर्मचारी, कॉल सेंटर्स यांच्याकडून खातेधारकांची माहिती मिळवली जायची आणि यानतंर तिची विक्री केली जायची अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
पोलिसांनी या मॉड्यूलचा पर्दाफाश करत मास्टरमाइंडला अटक केली असल्याची माहिती दक्षिण - पूर्व दिल्लीच्या डीसीपींनी दिली आहे. मास्टरमाइंडकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एक कोटी लोकांच्या बँक खात्यांची माहिती पुनर्प्राप्त करण्यात यश मिळालं आहे. अत्यंत कमी दरात विकल्या जाणा-या या माहितीमध्ये तुमचा कार्ड नंबर, कार्डधारकाचं नाव, जन्मदिनांक, मोबाई क्रमांक असतो. हा सर्व डाटा विभागांमध्ये विभागलेला असतो, ज्याची एकूण साईड 20 जीबीहून जास्त आहे.
हा सर्व डाटा आपण बल्कमध्ये विकायचो अशी माहिती अटक करण्यात आलेल्या पुरन गुप्ताने पोलिसांना दिली आहे. 50 हजार लोकांचा डाटा विकण्यासाठी 10 ते 20 हजार रुपये घेतले जायचे. हा सर्व डाटा मुंबईतील एका सप्लायरकडून विकत घेतल्याची माहिती मिळत आहे.
डाटा खरेदी करणारे माहितीच्या आधारे बँक कर्मचारी बनून लोकांना फोन करतात आणि त्यांना त्यांचा CVV आणि OTP नंबर शेअर करण्यास सांगतात. ज्याच्या मदतीने त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यात येतात. कोणत्याही बँक धारकाची सर्व माहिती उपलब्ध असल्याने लोकांनादेखील शंका येत नाही आणि ते यांच्या जाळ्यात फसतात. याशिवाय रिवॉर्ड पॉईंट, कार्ड ब्लॉक सारख्या गोष्टी सांगून त्यांच्याकडून पासवर्ड काढण्याचं काम केलं जातं.