जावयाच्या हत्येसाठी एक कोटीची सुपारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 12:38 AM2018-09-20T00:38:04+5:302018-09-20T00:39:01+5:30
हैदराबादेत आॅनर किलिंग; सात अटकेत
हैदराबाद : आपली मुलगी अमृता हिच्याशी प्रेमविवाह केल्याचा राग मनात ठेवून तिचे वडील टी. मारुती राव यांनी जावई पेरुमला प्रणय याची मारेकऱ्यांकरवी हत्या केली. या आॅनर किलिंगच्या प्रकरणात मिर्यालगुडा पोलिसांनी मंगळवारी सात जणांना अटक केली असून, त्यामध्ये गुजरातचे माजी गृहराज्यमंत्री हरेन पंड्या यांच्या हत्या प्रकरणात निर्दोष सुटलेल्या दोघा इसमांचाही समावेश आहे.
याप्रकरणी अटक केलेल्या सात जणांमध्ये मुलीचे वडील, मोहंमद अब्दुल बारी, अब्दुल करीम, टी. श्रवण, असगर अली, समुद्रल शिवा यांचाही समावेश आहे. मुलीच्या वडिलांनी जावयाच्या हत्येसाठी एक कोटी रुपयांची सुपारी दिली होती. त्यापैकी १५ लाख रुपये हत्येच्या आधी मारेकºयांना दिले होते. या हत्येचे हैदराबादमध्ये तीव्र पडसाद उमटले. दलित संघटनांनी या प्रकाराविरोधात जोरदार निदर्शने केली.
दलित ख्रिश्चन असलेल्या आपल्या जावयाची धारदार चाकूने हत्या करणाºया सुभाष शर्माला पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. प्रणय व अमृता वर्षिनी हे दोघे शाळेपासून एकमेकांना ओळखत होते. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. यंदा जानेवारीत अमृताने घर सोडले आणि प्रणयशी विवाह केला. तिच्या वडिलांना हा विवाह मान्य नव्हता. विवाहानंतर हे दाम्पत्य मिर्यालगुदाला राहायला आले. त्यावेळी त्या दोघांच्या जिवाला धोका असल्याची जाणीव स्थानिक पोलिसांनी करून दिली होती. त्यांना घरी सीसीटीव्ही लावायला सांगितले होते.
वर्षिनी ही सध्या गरोदर आहे. जातिप्रथा संपणे गरजेचे आहे; अन्यथा असे प्रकार घडत राहतील, असे सांगून, पतीच्या मारेकºयांना शिक्षा व्हावी, यासाठी आपण प्रयत्न करीत राहू, असे तिने म्हटले आहे. पतीच्या हत्येमुळे आपण घाबरलेलो नाही. पेरुमला प्रणय याची पत्नी म्हणूनच यापुढे जगणार आहोत, असेही ती म्हणाली. (वृत्तसंस्था)
मागितले अडीच कोटी
मुलीचे वडील टी. मारुती राव हे अब्दुल करीमला २०११ पासून ओळखत होते. प्रणयची हत्या करण्यासाठी त्यांनी जुलैमध्ये करीमला हाताशी धरले. करीमने मोहंमद अब्दुल बारी व असगर अली यांना ही सुपारी देण्याचे ठरविले. हत्येसाठी या दोघांनी अडीच कोटी रुपये मागितले. मात्र, त्यांना १ कोटी रुपये देण्याचे ठरले. मारुती रावने त्यातील १५ लाख रुपये या दोघांना आगाऊ दिले होते.