मोदींच्या दोन भेटवस्तूंसाठी प्रत्येकी कोटीची बोली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 03:37 AM2019-09-18T03:37:09+5:302019-09-18T03:37:21+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या सुरू असलेल्या लिलावात दोन भेटवस्तू प्रत्येकी एक कोटी रुपयांना विकल्या गेल्या आहेत.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या सुरू असलेल्या लिलावात दोन भेटवस्तू प्रत्येकी एक कोटी रुपयांना विकल्या गेल्या आहेत. यापैकी एक गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी दिलेला चांदीचा कलश आहे, तर दुसरा गुजरातमधील मोदी समाज मंडळाने दिलेला फोटो स्टॅण्ड आहे.
चांदीच्या कलशासाठी १,८०० रुपये राखीव किंमत ठेवण्यात आली होती. फोटो स्टॅण्डची राखीव किंमत ५०० रुपये ठेवण्यात आली होती. मात्र दोन्ही भेटवस्तूंना प्रत्येकी एक कोटी रुपयांची सर्वाधिक बोली आली व त्या किमतीला या वस्तू विकल्या गेल्या. मात्र या वस्तू कोणी खरेदी केल्या हे जाहीर करण्यात आले नाही. लिलावात चढ्या बोलीने विकली गेलेली एक भेटवस्तू सवत्स धेनूची पंचधातूची मूर्ती आहे. ही १,५०० रुपये राखीव किंमत असलेली वस्तू ५१ लाख रुपायांना विकली गेली होती.
मोदी यांना गेल्या सहा महिन्यांत देशाच्या दौऱ्यांमध्ये मिळालेल्या २,७७२ भेटवस्तूंचा ई-लिलाव १४ सप्टेंबरपासून सुरू झाला असून तो ३ आॅक्टोबरपर्यंत चालेल. या वस्तू येथील राष्ट्रीय आधुनिक कला दालनात (एनजीएमए) प्रदर्शनातही मांडण्यात आल्या आहेत. ‘एनजीएमए’तर्फे हा लिलाव होत असून ‘नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर’ने खास पोर्टल विकसित केले आहे.
या भेटवस्तूंमध्ये अनेक कलाकारांनी काढलेली एक हजाराहून अधिक पोर्टेट आहेत. इतर वस्तूंमध्ये विविध प्रकारचे खंजीर, कुकरी व सुरा यासारखी शस्त्रे, विविध राज्यांत प्रचलित असलेल्या पगड्या, अनेक शाली इत्यादींचा समावेश आहे. या सर्व वस्तूंसाठी २०० रुपयांपासून २.५ लाख रुपयांपर्यंत राखीव किंमती ठेवल्या आहेत. सर्वाधिक राखीव किंमत अस्ल रेशमी कापडावर काढलेल्या मोदींच्या पोर्टेटची आहे. पिछवाई शैलीतील आणखी एका पोर्टेटची किंमत दोन लाख रुपये आहे.
>रक्कम शिक्षणासाठी
मोदींना सरकारी दौऱ्यांमध्ये मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव गेल्या वर्षीही करण्यात आला होता. मात्र त्यातून एकूण किती रक्कम मिळाली हे जाहीर झाले नव्हते. गेल्या वर्षीच्या लिलावात बीएमडब्ल्यू मोटारीच्या एका लाकडी प्रतिकृतीस पाच लाख रुपयांची सर्वाधिक बोली आली होती. लिलावातून मिळणारे पैसे मोदींच्या इच्छेनुसार मुलींचे शिक्षण, अनाथालय यासारख्या कामांसाठी दिले जातात.