पुलवामा हल्ल्याच्या एक दिवस आधीच पाकिस्तानला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 06:28 PM2019-03-09T18:28:08+5:302019-03-09T18:31:26+5:30
अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सच्या दैनिकाने पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना बळ दिलं जात असल्याचं सांगितले. तसेच यूरोपीय संघाने पुलवामा हल्ल्याच्या एक दिवस अगोदरच पाकिस्तान राष्ट्राला हाय-रिस्क सूचीमध्ये टाकलं होतं.
नवी दिल्ली - दहशतवादी कृत्यांना आणि दहशतवादाचा खतपाणी देण्यासाठी पाकिस्तानचं नावं जगभरात प्रसिद्ध आहे. भारताविरोधातल्या अनेक दहशतवादी हल्ल्यामागे पाकचा हात असल्याचं निष्पन्न झाले आहे, संयुक्त राष्ट्रसंघातही अनेक वेळा भारताने पाकिस्तान विरोधात ठोस पुरावे सादर केले आहेत. पुरावे असूनही पाकिस्तानकडून दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई केली जात नाही. शुक्रवारी अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सच्या दैनिकाने पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना बळ दिलं जात असल्याचं सांगितले. तसेच यूरोपीय संघाने पुलवामा हल्ल्याच्या एक दिवस अगोदरच पाकिस्तान राष्ट्राला हाय-रिस्क सूचीमध्ये टाकलं होतं.
यूरोपीय संघाने मागील महिन्यात हाय-रिस्क लिस्टची नवीन यादी बनविण्याचे काम हाती घेतले. या यादीत 23 देशांची नावे नव्याने समाविष्ट करण्यात आली. या यादीत समाविष्ट असणाऱ्या देशांवर मनी लॉंड्रिंग आणि टेरर फंडींग केल्याचा आरोप लावलेला असतो. 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू आणि काश्मीर राज्यातील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. पण याच्या हल्ल्याच्या एक दिवस आधी म्हणजे 13 फेब्रुवारी रोजी यूरोपीय संघाने पाकिस्तानचे नाव हाय-रिस्क यादीत टाकले होते.
यूरोपीय संघाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात नमूद केलं आहे की, या यादीत ज्या देशांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत अशा देशांकडून सावध राहणे, या देशांपासून आपल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेचे रक्षण करणे अशी उद्धिष्टे आहेत. तसेच आपल्या देशातील बँका, सहकारी संस्थांनी यादीत समाविष्ट असणाऱ्या देशाची कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करू नये अथवा संशयास्पद व्यवहारांची चौकशी करावी असं लिहलं आहे.
यूरोपीय संघाकडून 23 देशांची नावे यादीत समाविष्ट केली आहेत. यामध्ये सौदी अरेबिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, उत्तर कोरिया, इराक, श्रीलंका, सीरिया यासारख्या प्रमुख देशांची नावे आहेत.