एकाने केले उद्ध्वस्त, दुसऱ्याने सारेच संपविले; तामिळनाडूत १५ तासांत ६०९ मिमी पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 05:49 AM2023-12-19T05:49:14+5:302023-12-19T05:49:26+5:30
पाऊस आणि पुरामुळे लष्कर, नौदल आणि हवाई दलाची मदत घेण्यात आली आहे.
चेन्नई/कन्याकुमारी : मुसळधार पावसाने कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थुथुकुडी आणि टेंकासीसह दक्षिण तामिळनाडूच्या अनेक भागांमध्ये भातशेती, रस्ते, निवासी क्षेत्रे आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. मागील १५ तासांत तब्बल २ फूट (६०९ मिमि) पाऊस झाल्याने नागरिकांची दैना झाली. मिचाँग चक्रीवादळाच्या संकटातून सावरत असतानाच हे दुसरे संकट आल्याने नागरिक रस्त्यावर आले आहेत.
पाऊस आणि पुरामुळे लष्कर, नौदल आणि हवाई दलाची मदत घेण्यात आली आहे. ८४ बोटी तैनात करण्यात आल्या असून, चारही जिल्ह्यांमध्ये सुट्टी जाहीर केली आहे. थुथुकुडी आणि श्रीवैकुंठम आणि कयालापट्टीमसारख्या भागातून किमान ७,५०० लोकांना बाहेर काढण्यात आले असून, त्यांना ८४ मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे.
तब्बल ८०० प्रवाशी ट्रेनमध्येच अडकले
nश्रीवैकुंठम आणि सेदुंगनल्लूर दरम्यानची रेल्वे वाहतूक स्थगित केली आहे. पुरामुळे सुमारे ८०० रेल्वे प्रवासी अडकले आहेत.
nदक्षिणेकडील अनेक रेल्वे सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आल्या, तर काही गाड्या अंशतः निलंबित करण्यात आल्या.
मदुराईला जाणारा लिंक रोडचा संपर्क तुटला
ओट्टापिदारमजवळील मदुराईला जाणारा लिंक रोडचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे आणि कन्याकुमारी जिल्ह्यातील ओझुगिनचेरीमध्ये पाण्याची पातळी चार फूट झाली आहे. पझायारू नदीची पाणीपातळी वाढल्याने भातशेती पाण्याखाली आहे.