कोसी नदीवर बांधण्यात येणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या पुलाचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 10:00 AM2024-03-22T10:00:08+5:302024-03-22T10:20:27+5:30
कोसी नदीवर बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या पुलाचा काही भाग कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बिहारमधील सुपौल येथे कोसी नदीवर बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या पुलाचा काही भाग कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुलाच्या 50, 51 आणि 52 क्रमांकाच्या पिलरचे गार्टर जमिनीवर कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी झाले. ढिगाऱ्याखाली 20 हून अधिक लोक दबले असण्याची शक्यताही स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
सुपौलमधील बकौर आणि मधुबनीतील भेजा घाट दरम्यान भारतातील सर्वात मोठा पूल बांधला जात आहे. या घटनेनंतर स्थानिक लोक प्रचंड संतापले आहेत. बकौर ते भेजादरम्यान पुलाचा गार्टर कोसळल्यानंतर अद्याप मदतकार्य सुरू करण्यात आलेले नाही. प्रशासनाचे पथक पोहोचले आहे, परंतु हे मध्यभागी झाल्याने, पुरेशी उपकरणं घटनास्थळी पोहोचू शकत नाहीत. अशा परिस्थितीत मदत आणि बचावकार्यात अनेक अडचणी येत आहेत.
#UPDATE | Supaul, Bihar: One died and nine injured as a portion of an under-construction bridge collapsed near Maricha between Bheja-Bakaur: Supaul DM Kaushal Kumar https://t.co/DhsS9ZCCws
— ANI (@ANI) March 22, 2024
सुपौल जिल्ह्यातील बकौर आणि मधुबनी जिल्ह्यातील भेजा दरम्यान बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात लांब (10.2 किमी) महासेतूचं बांधकाम वेगाने सुरू आहे. हा महासेतू केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाकडून 1199 कोटी 58 लाख रुपये खर्च करून बांधण्यात येत आहे.
या पुलाचे बांधकाम ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र जे आता 2024 च्या अखेरीस पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. आतापर्यंत पुलाचं 56 टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूण 171 पिलर असणार असून त्यापैकी 166 हून अधिक पिलर पूर्ण झाले आहेत. या पुलावर एकूण तीन किलोमीटरचा ॲप्रोच रोड तयार करण्यात येत आहे.