‘एक निवडणूक’मुळे संसाधनांचा नीट वापर; राष्ट्रपतींचा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 08:22 IST2025-01-26T08:22:37+5:302025-01-26T08:22:50+5:30
. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी देशाला दिलेल्या संदेशात हे वक्तव्य केले.

‘एक निवडणूक’मुळे संसाधनांचा नीट वापर; राष्ट्रपतींचा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संदेश
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : एक राष्ट्र, एक निवडणूक ही उत्तम संकल्पना आहे. त्यामुळे उत्तम कारभार करण्यास मदत होईल, धोरण अंमलबजावणीतील शिथिलता टाळता येईल, विखुरलेल्या संसाधनांचे एकत्रीकरण होऊन त्यांचा नीट वापर होऊ शकेल, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी देशाला दिलेल्या संदेशात हे वक्तव्य केले.
मुर्मू यांनी म्हटले आहे की, ब्रिटिश राजवटीत बनविलेले कायदे रद्द करून तीन नवे व आधुनिक स्वरूपाचे कायदे लागू करण्यात आले आहेत. जुने कायदे वसाहतवादी मानसिकतेचे प्रतीक होते. ते दूर होणे आवश्यक आहे. त्यामुळेच भारतीय परंपरेला साजेसे नवीन कायदे लागू करण्याचा विचार केंद्र सरकारने केला. तसेच एक राष्ट्र, एक निवडणूक ही संकल्पनाही तितकीच महत्त्वाची आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आल्यास देशावर कमी आर्थिक ताण येईल. राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, भारताचे संविधान अतिशय महत्त्वाचे आहे. त्यातील तरतुदींमुळे भारताच्या विकासाला चालना मिळाली. भारतीय संविधान बनविण्याच्या समितीत १५ महिला सदस्यांचा सहभाग होता. त्यांनी राज्यघटना निर्मितीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. जगातील इतर देशांत महिलांना समान दर्जा देण्याबाबत नकारात्मक वातावरण होते. मात्र भारतात महिलांनी देशाचे भवितव्य प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी भारतातील लोकशाही व्यवस्थेला आकार दिला.
‘शेतकरी, कामगारांच्या योगदानामुळे अर्थव्यवस्था प्रभावी’
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले की, शेतकरी, कामगारांच्या योगदानामुळे भारतीय अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर प्रभावी ठरली आहे. आर्थिक विकासामुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सरकारने काही योजना राबविल्या आहेत. सर्वसमावेशक धोरणे राबविणारा व नैतिकतेच्या पायावर उभा असलेला भारत निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी संविधान महत्त्वाचे आहे, असे त्या म्हणाल्या.