१ मेपासून ‘वन एम्प्लॉई, वन ईपीएफ अकाऊंट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2016 04:01 AM2016-04-25T04:01:57+5:302016-04-25T04:01:57+5:30
एकापेक्षा जास्त खाती आणि मुदतपूर्व पैसे काढण्यापासून कर्मचाऱ्यांचे मन वळविण्यासाठी प्रॉव्हिडंट फंड विभागातर्फे लवकरच येत्या १ मेपासून ‘वन एम्प्लॉई, वन ईपीएफ अकाऊंट’ ही योजना सुरू करण्यात येणार आहे.
मुंबई : एकापेक्षा जास्त खाती आणि मुदतपूर्व पैसे काढण्यापासून कर्मचाऱ्यांचे मन वळविण्यासाठी प्रॉव्हिडंट फंड विभागातर्फे लवकरच येत्या १ मेपासून ‘वन एम्प्लॉई, वन ईपीएफ अकाऊंट’ ही योजना सुरू करण्यात येणार आहे.
प्रॉव्हिंडट फंड विभागाच्या २१ एप्रिल रोजी झालेल्या अंतर्गत बैठकीत ‘वन एम्प्लॉई, वन ईपीएफ अकाऊंट’ या योजनेचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेंतर्गत राज्य सरकार व राज्य सरकारांच्या अखत्यारीतील स्थानिक स्वराज्य संस्थांसारख्या विविध शासकीय सेवांमधील कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिंडट फंड सेवेमध्ये समाविष्ट करण्याच्या दृष्टीने विभागातर्फे अधिक सक्रियपणे काम होणार आहे.
प्रॉव्हिडंट फंड विभागाचे केंद्रीय आयुक्त व्ही.पी. जॉय यांनी सांगितले की, बहुतांश वेळा लोक नोकरी बदलताना प्रॉव्हिडंट फंडातील पैसे काढून घेतात. नोकरी बदलली अथवा अन्य काही कारणासाठी मुदतपूर्व पैसे काढण्यापासून त्यांना परावृत्त करण्याच्या दृष्टीने विभागातर्फे विशेष व्यवस्था निर्माण केली जात आहे.