महात्मा गांधींनी साधे राहणीमान स्वीकारल्याच्या घटनेला शंभर वर्षे पूर्ण; हुतात्मा कनकलता यांना देशाचे अभिवादन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 06:54 AM2021-09-23T06:54:22+5:302021-09-23T06:54:56+5:30
दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधी सुटाबुटात वावरत असत; पण भारतात आल्यानंतर त्यांनी पाश्चिमात्य पोशाखाला दूर केले व पारंपरिक गुजराती पोशाखात ते वावरू लागले.
नवी दिल्ली :भारतातील गरीब लोक जसा वेश परिधान करतात तसेच आपणही राहायचे असे ठरवून महात्मा गांधी यांनी २२ सप्टेंबर १९२१ रोजी आपल्या गुजराती वेशभूषेचा त्याग केला व ते पंचा नेसू लागले. या ऐतिहासिक घटनेला बुधवारी शंभर वर्षे पूर्ण झाली. आसाममधील स्वातंत्र्यसेनानी कनकलता बरूआ या एका पोलीस ठाण्यावर २० सप्टेंबर १९४२ रोजी ध्वज फडकविण्याच्या प्रयत्नात असताना, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शहीद झाल्या. त्या घटनेला ७९ वर्षे पूर्ण झाली.
देशाला स्वातंत्र्यप्राप्ती झाली, त्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात, या ऐतिहासिक घटनांचे देशभरात स्मरण केले जात आहे. दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर गांधीजींनी देशभर दौरा करून जनतेच्या स्थितीची पाहणी केली होती. दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधी सुटाबुटात वावरत असत; पण भारतात आल्यानंतर त्यांनी पाश्चिमात्य पोशाखाला दूर केले व पारंपरिक गुजराती पोशाखात ते वावरू लागले.
- देशातील गरीब जनता किती हालअपेष्टांमध्ये जगते आहे हे खूप जवळून पाहिल्यानंतर गांधीजींनी अत्यंत साधे राहणीमान स्वीकारले. त्यांनी गुजराती पोशाखाचाही त्याग केला. निव्वळ पंचा नेसून यापुढे राहायचे असा निर्धार त्यांनी केला.
- या अतिशय साध्या वेशात ते पहिल्यांदा मदुराई येथे
२२ सप्टेंबर १९२१
रोजी वावरले. तिथे त्यांनी भाषणही केले.
- ती जागा गांधीजी पोट्टल म्हणून प्रसिद्ध आहे. या घटनेला यंदा शंभर वर्षे पूर्ण झाली.
महत्त्वाच्या घटनांना उजाळा
स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात आसाममध्ये एका पोलीस ठाण्यावर तिरंगा फडकविण्याच्या प्रयत्नात असताना कनकलता बरुआ या अवघ्या १७ वर्षे वयाच्या स्वातंत्र्यसेनानी २० सप्टेंबर १९४२ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शहीद झाल्या. त्या घटनेला यंदा ७९ वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवी वर्षात स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाच्या घटनांना उजाळा दिला जात आहे. त्यानुसार महात्मा गांधी व कनकलता बरुआ यांच्याशी संबंधित घटनांचे स्मरण करून त्यांना देशभरात अभिवादन करण्यात आले.