श्रीनगरमधील पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला, एकाचा मृत्यू

By Admin | Published: April 30, 2017 09:24 PM2017-04-30T21:24:36+5:302017-04-30T21:32:11+5:30

खानयार पोलीस चौकीवर काही जणांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

One killed in grenade attack on police post in Srinagar | श्रीनगरमधील पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला, एकाचा मृत्यू

श्रीनगरमधील पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला, एकाचा मृत्यू

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 30 - खानयार पोलीस चौकीवर काही जणांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमी पोलिसांनी उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या हल्ल्यात 2 सामान्य नागरिकही जखमी झाले, ज्यातील एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
 
 
पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. घटनास्थळ आणि आसपासच्या परिसरात पोलीस आणि सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. 
 
यापूर्वी 2 एप्रिल रोजी नोहट्टा परिसरात दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता, ज्यात एक पोलीस कर्मचारी शहीद झाला होता. तर अन्य 14 जण जखमी झाले होते.
 
दरम्यान, दोन आठवड्यांनंतर शनिवारी काश्मीर खो-यात मोबाइल इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली होती. मात्र फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, गुगल अॅप, युट्यूह, स्नॅपचॅट सारख्या साइटवर बंदी कायम आहे. 
 
दगडफेक करणा-यांना दहशतवादी कारवायांमध्ये  सहभागी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर होत असल्यानं काश्मीर खो-यात यावर बंदी आणण्यात आली आहे. 
 
एकीकडे काश्मीर खोरे धुमसत असताना दुसरीकडे पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी या वादात आणखी तेल ओतण्याचे काम केले आहे. 
 
काश्मिरी जनतेचे अधिकार मिळवण्यासाठी सुरू असलेल्या त्यांच्या संघर्षाला पाकिस्तान समर्थन देत राहणार, असे विधान करत त्यांनी काश्मीरचा मुद्दा भडकवण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
हाजी पीर सेक्टर परिसराच्या दौ-यावर असलेल्या बाजवा यांना भारतीय जवानांनाकडून कथित स्वरुपातील शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची माहिती देण्यात आली. सोबत कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याविरोधात दोन हात करण्यासाठी पाकिस्तानचे सैन्य तयारीत असल्याचेही यावेळी त्यांना सांगण्यात आले. याचदरम्यान, बाजवा यांनी काश्मिरींच्या संघर्षासाठी पाकिस्तान आपले समर्थन देत राहणार, असे विधान करत आगीत आणखी तेल ओतण्याचं काम केले आहे. 
 
 "स्वयंनिर्णयाचे अधिकार आणि मूलभूत मानवी हक्कांसाठी काश्मिरी जनतेच्या राजकीय संघर्षाला आम्ही समर्थन देत राहणार", असे सांगत पाकिस्तानी सैन्याशी बातचित करताना बाजवांनी काश्मीर खो-यात अशांतता आणखी वाढवण्याच प्रयत्न केला आहे.
यावेळी त्यांनी भारतावर काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवत असल्याचाही आरोप केला. भारत केवळ काश्मिरी जनतेच्या नाहीतर नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानच्या भागात राहणा-या लोकांविरोधात हल्ले करण्यात सहभागी आहे, असा कांगावादेखील यावेळी बाजवा यांनी केला. 

Web Title: One killed in grenade attack on police post in Srinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.