चेकपोस्ट टाळण्यासाठी बाईक सुस्साट पळवली, एकाचा मृत्यू; अंगावर काटा आणणारा अपघात CCTVमध्ये कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 03:28 PM2021-05-24T15:28:42+5:302021-05-24T15:30:32+5:30
चेकपोस्ट टाळण्यासाठी दुचाकी भरधाव वेगानं पळवली; चेकपोस्टच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू
मंचेरिअल: तपासणी टाळण्यासाठी बाईक भरधाव वेगानं पळवणं दोन तरुणांना महागात पडलं आहे. तेलंगणातील मंचेरिअल जिल्ह्यात झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाला आहे. २२ मे रोजी तपालपूर गावात हा भीषण अपघात झाला.
मंचेरिअल जिल्ह्यातील जन्नाराममध्ये वन विभागाचा चेकपोस्ट आहे. २२ मे रोजी एक दुचाकीस्वार इथून अतिशय भरधाव वेगानं निघाला होता. त्याच्या मागे दुचाकीवर आणखी एक जण होता. वन विभागाचा अधिकारी चेकपोस्टजवळ उभा होता. वेगानं येणारी दुचाकी पाहून अधिकाऱ्यानं हातवारे करून त्यांना थांबण्याची सूचना केली. मात्र तरीही दुचाकीस्वारानं वेग कमी केला नाही. चेकपोस्टवरील तपासणी चुकवण्यासाठी त्यानं वेग आणखी वाढवला.
Freak accident caught on cctv camera in Mancherial district. Biker booked for rash and negligent riding after pillion rider dies on spot. They were trying to evade cops. #Telangana
— Paul Oommen (@Paul_Oommen) May 24, 2021
PS- Accident footage, viewer discretion advised. pic.twitter.com/OpbsxHku6o
दुचाकीस्वार वेग कमी करण्याऐवजी वाढवत असल्याचं लक्षात येताच वन विभागाच्या अधिकाऱ्यानं चेकपोस्टवर शक्य तितक्या वर नेण्याचा प्रयत्न केला. दुचाकीवरील दोन्ही व्यक्ती चेकपोस्टला धडकू नये यासाठी त्यानं शेवटपर्यंत प्रयत्न केले. चेकपोस्ट जवळ येताच दुचाकी चालवत असलेल्या व्यक्तीनं मान खाली झुकवली आणि धडक टळली. मात्र त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीचा अंदाज चुकला आणि तो चेकपोस्टला धडकला. ही धडक इतकी भीषण होती की त्याचा जागीच मृत्यू झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यानं प्राण सोडला. सुदावेनी व्यंकटेश गौड असं त्याचं नाव असल्याची माहिती नंतर समोर आली. तर दुचाकी चालवत असलेल्या व्यक्तीचं नाव बंडी चंद्रशेखर असून तो कोत्थाकुम्मूगुदेम गावाचा रहिवासी आहे.