पत्रकारांना भेट म्हणून एक लाखाची रोकड; कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 06:56 AM2022-10-30T06:56:00+5:302022-10-30T06:56:07+5:30

बोम्मई यांनी कर्नाटकातील प्रत्येक पत्रकाराला एक लाख रुपये रोख पाठवून संपूर्ण पत्रकार समुदायाला लाच देण्याचा प्रयत्न केला आहे.

One lakh cash as a gift to journalists; Demand for inquiry into Karnataka Chief Minister | पत्रकारांना भेट म्हणून एक लाखाची रोकड; कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या चौकशीची मागणी

पत्रकारांना भेट म्हणून एक लाखाची रोकड; कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या चौकशीची मागणी

Next

नवी दिल्ली/बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिवाळीनिमित्त पत्रकारांना एक लाख रुपयांची रोख भेट पाठवून लाच देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत काँग्रेसने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्याची व त्यांच्या राजीनाम्याची शनिवारी मागणी केली. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीने या प्रकरणाला मुख्यमंत्री कार्यालयाची (सीएमओ) पत्रकारांना ‘स्वीट बॉक्स’ लाच असे संबोधत न्यायालयीन चौकशीची मागणी केली. 

दरम्यान, पत्रकारांना ‘रोख रक्कम’ दिल्याची माहिती आपणास नव्हती, असे बोम्मई यांनी म्हटल्याचे सीएमओच्या सूत्रांनी सांगितले. नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले, बोम्मई सरकारची लाचखोरी आता उघड झाली आहे आणि यावेळी स्वतः मुख्यमंत्री जबाबदार आहेत.

बोम्मई यांनी कर्नाटकातील प्रत्येक पत्रकाराला एक लाख रुपये रोख पाठवून संपूर्ण पत्रकार समुदायाला लाच देण्याचा प्रयत्न केला आहे. लाचखोरी उघड करणाऱ्या आमच्या पत्रकार मित्रांना सलाम, असे सुरजेवाला म्हणाले. सुरजेवाला काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी आहेत. गेले अनेक दिवस राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्याकडून करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे वादात सापडले आहेत. नेमका याचा फायदा घेत विरोधकांनी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. 

‘पेसीएम’मुळे सरकार बदनाम

४० टक्के भ्रष्ट बोम्मई सरकारने असा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नाही, असा आरोपही त्यांनी केला. राज्यातील जनतेने सुरू केलेल्या ‘पेसीएम’ मोहिमेमुळे कर्नाटकातील भाजप सरकार बदनाम झाले आहे, असा दावाही त्यांनी केला. राज्यातील भाजप सरकारच्या काळात नोकरभरती, पदस्थापना व कंत्राटात लाचखोरी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या मालिकेत आता मुख्यमंत्र्यांनीच पत्रकारांना लाच देण्याचा प्रयत्न केला. पैसे कुठून आले, असा सवाल सुरजेवाला यांनी केला.

Web Title: One lakh cash as a gift to journalists; Demand for inquiry into Karnataka Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.