मंगळावर जाण्यासाठी तब्बल 1 लाख भारतीयांनी केलं बुकिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 10:14 AM2017-11-09T10:14:01+5:302017-11-09T10:16:28+5:30
मंगळावर जाण्यासाठी तब्बल 1 लाख 38 हजार 899 भारतीयांनी बुकिंग केलं आहे.
मुंबई- मंगळावर जाण्यासाठी तब्बल 1 लाख 38 हजार 899 भारतीयांनी बुकिंग केलं आहे. 2018 मध्ये मंगळावर जाण्याचं नासाचं मिशन सुरू होणार असून त्यासाठी तिकीटांचं बुकिंग सुरू झालं आहे. नासाने तिकीट बुकिंग सुरू करताच जगभरातून या तिकीट खरेदीला प्रतिसाद मिळत आहे. यात तब्बल 1 लाख 38 हजार 899 भारतीयांनी मंगळावर जाण्यासाठी तिकीट बुक केलं आहे. मंगळावर जाण्यासाठी तिकीट बुक करणाऱ्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
नासाने Insight मिशन अंतर्गत मंगळावर जाण्याची मोहीम आखली आहे. ज्या लोकांनी मंगळावर जाण्यासाठी तिकीट बुक केलं आहे, त्यांना नासाकडून ऑनलाइन बोर्डिंग पास देण्यात येणार आहे. मंगळावर जाणाऱ्यांची नावं एका सिलिकॉन चिपवर इलेक्ट्रॉनिक्स बीमच्या मदतीने कोरण्यात येणार आहेत. चिपवर कोरलेली ही अक्षरं केसांच्या हजाराव्या भागाहून पातळ असतील, असं सुत्रांनी सांगितलं.
मंगळावर जाण्यासाठी तिकीट बुक करणाऱ्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी आहे. या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेतून 6 लाख 76 हजार 773 लोकांनी मंगळ मिशनसाठी तिकीट बुकिंग केलं आहे. तर दुसऱ्या स्थानावर चीन असून चीनमधून 2 लाख 62 हजार 752 लोकांनी मंगळावर जाण्यासाठी बुकिंग केल आहे.
दरम्यान, मंगळ मोहीम हे नासाचं मिशन असल्यानं अमेरिकेतून त्याला सर्वाधिक प्रतिसाद मिळणं अपेक्षितच होतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तर भारत आणि अमेरिकेमधील अंतराळ तंत्रज्ञानातील परस्पर संबंधामुळे भारतीयांनीही मंगळावर जाण्यासाठी सर्वाधिक उत्सूकता दाखविल्यांच तज्ज्ञांनी सांगितलं.
मंगळयान मोहीमेसाठी नाव नोंदणी गेल्या आठवड्यात बंद झाली. त्यामुळे आता नवीन नोंदणी होणार नाही. हे मिशन 2018 ला सुरू होणार असून 26 नोव्हेंबर 2018 रोजी सर्वजण मंगळावर पोहचतील. एकूण 720 दिवसाचं हे मिशन आहे. यावेळी मंगळावर होणाऱ्या भूकंपाचा अभ्यास करण्यात येणार असल्याचं नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल)ने सांगितलं.