प्लास्टिकचा वापर करून बनविले एक लाख किलोमीटरचे पक्के रस्ते, कचऱ्याची योग्य विल्हेवाट, रस्त्याच्या खर्चात बचत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 03:49 AM2020-07-11T03:49:01+5:302020-07-11T07:19:33+5:30
डांबर आणि प्लास्टिक यांचे योग्य मिश्रण रस्ते बनविण्यासाठी वापरले जाते. एक किलोमीटर रस्त्यासाठी नऊ टन डांबर आणि एक टन प्लास्टिक वापरले जाते. याचाच अर्थ प्रत्येक एक किलोमीटर रस्त्यामागे एक टन डांबर वाचले आहे.
नवी दिल्ली : प्लास्टिकच्या कच-याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने अनोखा मार्ग शोधून काढला आहे. प्लास्टिकपासून चक्क पक्के रस्ते बनविण्यात येत असून, आतापर्यंत असे एक लाख किलोमीटर लांबीचे रस्ते बनविण्यात आले आहेत. याद्वारे दोन गोष्टी साध्य झाल्या आहेत. एक म्हणजे प्लास्टिकच्या कचºयाची विल्हेवाट लावणारा एक उत्तम मार्ग उपलब्ध झाला आहे. दुसरे म्हणजे, रस्ते बांधण्याच्या खर्चात काही प्रमाणात बचत झाली आहे.
डांबर आणि प्लास्टिक यांचे योग्य मिश्रण रस्ते बनविण्यासाठी वापरले जाते. एक किलोमीटर रस्त्यासाठी नऊ टन डांबर आणि एक टन प्लास्टिक वापरले जाते. याचाच अर्थ प्रत्येक एक किलोमीटर रस्त्यामागे एक टन डांबर वाचले आहे. अशा प्रकारे प्लास्टिकच्या वापरामुळे रस्त्यांच्या बांधकामाच्या खर्चातही मोठी बचत होत आहे. रस्त्यांसाठी प्लास्टिकचा वापर करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २0१६ मध्ये केली होती. आतापर्यंत ११ राज्यांतील एक लाख किलोमीटर लांबीच्या रस्त्यांत प्लास्टिक वापरले गेले आहे. गुरुग्रामच्या महापालिकेने २0१८ मध्ये पहिल्यांदा रस्त्यांसाठी प्लास्टिकचा वापर केला. आसामने यंदाच प्लास्टिकचा वापर सुरू केला आहे. २७0 कि.मी. लांबीच्या जम्मू-काश्मीर राष्ट्रीय महार्गासाठी प्लास्टिकचा वापर केला गेला आहे. दिल्ली-मेरठच्या दोन कि.मी. पट्ट्यासाठी १.६ टन प्लास्टिक वापरले गेले. दिल्ली विमानतळाला जोडणाºया धौला कुँवा रस्त्याच्या बांधकामातही प्लास्टिक वापरले.
दररोज तयार होतो २५,९४0 टन प्लास्टिक कचरा
भारतात दररोज २५,९४0 टन प्लास्टिक कचरा तयार होतो. हा कचरा ४,३00 हत्तींच्या वजनाएवढा आहे. यातील ६0 टक्के कचरा रिसायकल होतो. बाकीचा जमिनीवरच पडून राहतो. हाच कचरा मग ड्रेनेज तुंबवतो, मायक्रो प्लास्टिकच्या स्वरूपात समुद्रात जातो. काही कचरा जाळला जातो. त्यातून वायुप्रदूषण होते.
रस्ते बांधण्यासाठी प्लास्टिकचा वापर केल्यामुळे प्लास्टिक कचºयाची समस्या काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे. रस्त्यांच्या बांधकामात प्लास्टिकचा वापर आणखी वाढल्यास ही समस्या कमी होईल.