चार वर्षांत एक लाख विद्यार्थ्यांची गळती
By admin | Published: March 21, 2017 12:24 AM2017-03-21T00:24:28+5:302017-03-21T00:24:28+5:30
मेघालयात गत चार वर्षांत एक लाख विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य सरकारनेच
शिलाँग : मेघालयात गत चार वर्षांत एक लाख विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य सरकारनेच विधानसभेत ही आकडेवारी सादर केली आहे. आर्थिक परिस्थिती, भावंडांचा सांभाळ आणि स्थलांतर यासारख्या कारणांमुळे या मुलांनी शाळा सोडल्याचे दिसून येत आहे.
शिक्षणमंत्री डेबरा सी मार्क यांनी विधानसभेत सांगितले की, मुलांच्या शाळा सोडण्यामागे प्रमुख कारण आहे, आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती. भांवडांचा सांभाळ किंवा अन्य घरगुती कारण आणि स्थलांतर यासारखी कारणेही शाळा सोडण्यामागे आहेत. त्या म्हणाल्या की, २०१३-१४ या वर्षात ३३,५५७ विद्यार्थ्यांनी शाळा सोडली. २०१४-१५ मध्ये ३१,२७६ विद्यार्थ्यांनी आणि गतवर्षी १४,९५७ विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरविली आहे. या मुलांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी विशेष केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून या मुलांना शाळेत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. जे विद्यार्थी दिवसा शाळेत येऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी सोयीनुसार शाळेची वेळ ठरविण्याचा प्रयोग यापूर्वी करण्यात आला आहे. मोफत पुस्तके, माध्यान्ह भोजन आणि मोफत शिक्षण यासारख्या योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाळेत आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेषत: पालकांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले जात आहे. जागतिक साक्षरता दिवसानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. कोळसा खाणीच्या क्षेत्रात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना परिवहन भत्ते देण्यात आले. शाळाबाह्य मुलांना परत शाळेत आणण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.