कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 08:32 PM2024-10-20T20:32:59+5:302024-10-20T20:37:00+5:30

राजकारणाशी कुठलाही संबंध नसलेल्या तरुणांना राजकारणात आणण्याची घोषणा पीएम मोदींनी केली आहे.

One lakh youth will be brought into politics; PM Modi's big announcement in Varanasi | कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा

कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा

वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(20 ऑक्टोबर 2024) आपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये 6700 कोटी रुपयांचे 23 प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. दरम्यान, यावेळी भाषणात त्यांनी कुटुंबवादाची मानसिकता नष्ट करण्यासाठी एक मोठी घोषणा केली. 'आम्ही राजकीय घराण्याशी कुठलाही संबंध नसलेल्या एक लाख तरुणांना राजकारणात आणणार आहोत', असे मोदी यावेळी म्हणाले. 

कुटुंबवादावर प्रहार करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, कुटुंबवादामुळे तरुणांचे सर्वाधिक नुकसान होत आहे. यासाठी आम्ही अशा एक लाख तरुणांना राजकारणात आणण्याचा संकल्प केला आहे, ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. त्यांना नव्या राजकारणाचे केंद्रस्थान बनवले जाईल. आमच्या सरकारमध्ये कोणाशीही भेदभाव केला जात नाही.

आम्ही जे बोलतो, ते करुन दाखवतो...
आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील पंतप्रधान मोदींचा हा दुसरा वाराणसी दौरा होता. या दौऱ्यात त्यांनी आरजे शंकरा नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन केले आणि शंकराचार्य स्वामी शंकर विजयेंद्र सरस्वती यांची भेट घेऊन त्यांची प्रकृती जाणून घेतली. आपल्या भाषणात राम मंदिराच्या उभारणीचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले की, 'आम्ही जे बोलतो, ते कुठल्याही परिस्थितीत करुन दाखवतो. अयोध्येत भव्य राम मंदिर बांधले जाईल, असे आम्ही सांगितले होते आणि ते आम्ही करुन दाखवले. आज लाखो लोक रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जात आहेत.'

संपूर्ण देशाचा आशीर्वाद मिळाला
मोदी पुढे म्हणतात, 'आमच्या सरकारने तिहेरी तलाकपासून स्वातंत्र्य आणि महिलांना आरक्षण देण्याचे काम केले आहे. सरकारने कोणाचा हक्क हिरावून घेतलेला नाही, उलट गरिबांना दहा टक्के आरक्षण देण्याचे कामही केले आहे एनडीए सरकार जे काही करत आहे, त्याला संपूर्ण देश आशीर्वाद देत आहे. हरयाणात सलग तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन झाले. जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला विक्रमी मते मिळाली.'
 

Web Title: One lakh youth will be brought into politics; PM Modi's big announcement in Varanasi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.