परीक्षार्थींसाठी दहा लाख मास्क; जेईई, नीटची परीक्षा घेण्यावर केंद्र सरकार ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 02:26 AM2020-08-29T02:26:18+5:302020-08-29T07:23:36+5:30
जेईई (मेन) परीक्षेसाठी कोरोना साथीच्या आधी एनटीएने ५७० परीक्षा केंद्रे सज्ज ठेवली होती. मात्र, त्यात आता वाढ होऊन ६६० परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
नवी दिल्ली : कोरोनाची साथ असली तरी जेईई (मेन) व नीटची परीक्षा घेण्यावर केंद्र सरकार ठाम आहे. ही परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)ने परीक्षार्थींच्या आरोग्य सुरक्षेसाठी दहा लाख मास्क, हातमोजांच्या १० लाख जोड्या, १३०० इन्फ्रारेड थर्मामीटर व ६६०० लिटर हँड सॅनिटायझर आदी गोष्टी सुमारे १३ कोटी रुपये खर्च करून घेतल्या आहेत.
अभियांत्रिकी शाखेला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी जेईई (मेन) ही आॅनलाईन परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत, तर वैद्यकीय, तसेच दंतवैद्यकीय प्रवेशांसाठी नीट ही परीक्षा १३ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. त्याशिवाय ६६०० स्पंज, ३,३०० स्प्रे बाटल्या विकत घेण्यात आल्या असून, परीक्षेच्या दिवसांत ३,३०० स्वच्छता कर्मचारी परीक्षा केंद्रांवर सज्ज असतील. जेईई (मेन) या परीक्षेला सुमारे ८.५८ लाख विद्यार्थी बसणार असून, तिथे १.१४ लाख जण पर्यवेक्षक म्हणून काम पाहणार आहेत. त्यासाठी एनटीएने जय्यत तयारी केली आहे. जेईई (मेन) व नीट परीक्षा कोरोनाच्या काळात घेण्यास काही राज्य सरकारांनी तीव्र विरोध दर्शविला होता.
फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना
जेईई (मेन) व नीट परीक्षांच्या दर ३० परीक्षार्थींमागे २ पर्यवेक्षक ठेवण्यात आले होते. आता हेच प्रमाण १५ परीक्षार्थींपुरते मर्यादित ठेवण्यात आले आहे. आता पर्यवेक्षकांची संख्या वाढवून ती १.४ लाख करण्यात आली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी एकाच वेळी २० मिनिटांच्या कालावधीत किमान ४० विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जाईल.