हेरगिरीच्या आरोपाखाली आणखी एकास अटक
By admin | Published: October 30, 2016 02:16 AM2016-10-30T02:16:45+5:302016-10-30T02:16:45+5:30
हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकारी मोहम्मद अख्तरवर कारवाई केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचने शनिवारी आणखी
नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकारी मोहम्मद अख्तरवर कारवाई केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रँचने शनिवारी आणखी एका इसमाला अटक केली आहे. त्याला शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले होते.
फाहत असे त्याचे नाव नाव असून तो समाजवादी पक्षाचे राज्यसभा सदस्य मुनावर सलीम यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्याला खासदार मुनावर सलीम यांच्या निवासस्थानातूनच ताब्यात घेण्यात आले होते. कसून चौकशी केल्यानंतर त्याला शनिवारी दुपारी अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. तो खा. सलीम यांचा स्वीय सहाय्यक म्हणून काम करीत होता. त्याची आम्ही आणखी चौकशी करीत आहोत. त्यांच्या चौकशीतून जी नावे समोर आली आहेत, त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. पाकिस्तानी उच्चयुक्तातील अख्तरशी फहत याच संबंध होते आणि तोही काही गुप्त माहिती अख्तरला देत होता, असे प्राथमिक चौकशीत पोलिसांना आढळून आले आहे.
त्याच्या अटकेनंतर पोलीस कदाचित खा. मुनावर सलीम यांच्याकडे जातील आणि त्यांच्याकडून काही माहिती घेतील, अशी शक्यता आहे. दोनच दिवसांपूर्वी मोहम्मद अख्तर या पाकिस्तानी अधिकाऱ्याला दिल्लीतील प्राणी संग्रहालयातून ताब्यात घेण्यात आले होते. तिथे त्याला भेटण्यासाठी आलेल्या दोन राजस्थानी नागरिकांनाही नंतर पोलिसांनी अटक केली.
भारतीय सैन्याच्या तैनातीविषयी तसेच बीएसएफच्या चौक्यांसंबंधीची माहिती ते दोघे या अधिकाऱ्याला देत असत, असे उघडकीस आले होते. त्यांच्याबरोबर राजस्थानचा आणखी एक जण होता. पण तो त्यावेळी उपस्थित नव्हता. मात्र दोघांच्या चौकशीतून त्याचे नाव व माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोएबला या पासपोर्ट व व्हिसा एजंटला अटक केली. याआधी शुक्रवारी राजस्थानमधून पाकिस्तानी हेर शोएबला अटक करण्यात आली होती. तसंच पाकिस्तानी अधिकारी मोहम्मद अख्तरला मदत करणा-या मौलाना रमजान आणि सुभाष जांगड या दोघांना गुरुवारी दिल्लीतून ताब्यात घेण्यात आले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सुरजित सिंग भारतात परतले
मोहम्मद अख्तर यांना ४८ तासांत देश सोडण्याच्या सूचना परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी दिल्या होत्या. त्याप्रमाणे तो आज भारतातून निघून गेला.
भारताने त्याची हकालपट्टी केल्यानंतर पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तातील सुरजित सिंग यांना देश सोडण्यास सांगितले होते. तेही आज तेथून निघून भारतात परत आले.