शिवशक्तीचे एक स्थान चंद्रावर दुसरे काशीमध्ये : नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 05:49 AM2023-09-24T05:49:57+5:302023-09-24T05:50:32+5:30
वाराणसीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमचे केले भूमिपूजन
वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी त्यांचा मतदारसंघ वाराणसी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचे भूमिपूजन केले. ते म्हणाले की, ‘देशात असे वातावरण झाले आहे की, जो खेळेल तो फुलेल.’ ‘हर हर महादेव’च्या जयघोषात भोजपुरीमध्ये पंतप्रधानांनी भाषणाची सुरुवात केली आणि ते म्हणाले की, ‘आज पुन्हा वाराणसीमध्ये येण्याची संधी मिळाली.
वाराणसीमध्ये मला जो आनंद मिळाला तो शब्दात सांगणे अशक्य आहे. आज मी अशा दिवशी काशीला आलो आहे, जेव्हा भारत चंद्राच्या शिवशक्ती बिंदूवर पोहोचून एक महिना पूर्ण होत आहे. शिवशक्ती म्हणजे असे स्थान जिथे गत महिन्यात २३ रोजी चंद्रयान उतरले होते. शिवशक्तीचे एक स्थान चंद्रावर आणि दुसरे शिवशक्तीचे स्थान माझ्या काशीत आहे.’ यावेळी जमलेल्या जनसमुदायाला वारंवार माझे कुटुंबीय म्हणून संबोधित करताना ते म्हणाले की, ‘ज्या ठिकाणी आपण सर्व एकत्र आलो ते पवित्र स्थानासारखे आहे. हे ठिकाण माता विंध्य धाम आणि काशी शहराला जोडणाऱ्या मार्गावरील ठिकाण आहे. येथून काही अंतरावर समाजवादी नेते राजनारायण यांचे गाव आहे.’ (वृत्तसंस्था)
उज्ज्वल भविष्याबद्दल आत्मविश्वास वाढतो...
n काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील शहडोल येथे आदिवासी गावाला दिलेल्या भेटीचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘मला तेथील काही तरुणांना भेटण्याची संधी मिळाली. मला खूप आश्चर्य वाटले. तरुण म्हणाले की, हे माझे मिनी ब्राझील आहे. ते म्हणाले की, प्रत्येक घरात फुटबॉलपटू आहेत.
n हे पाहून देशाच्या उज्ज्वल भविष्याबद्दल माझा आत्मविश्वास वाढतो. नऊ वर्षांपूर्वीच्या तुलनेत क्रीडा बजेट तीनपट वाढले आहे. ‘खेलो इंडिया’ कार्यक्रमाचे बजेट गेल्यावर्षी ७० टक्क्यांनी वाढले आहे.’
४५० कोटी रुपये खर्च
येथील रजतलाब परिसरातील रिंगरोडजवळ सुमारे ४५० कोटी रुपये खर्चून बांधले जाणारे आणि ३० एकरांपेक्षा जास्त क्षेत्रफळावर पसरलेले हे स्टेडियम डिसेंबर २०२५ पर्यंत तयार होण्याची शक्यता आहे. कानपूर आणि लखनौनंतर उत्तर प्रदेशातील हे तिसरे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असेल.
आज काशीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी झाली आहे. हे केवळ वाराणसीसाठी नव्हे, तर पूर्वांचलच्या तरुणांसाठी वरदान ठरेल. हे स्टेडियम तयार झाल्यावर ३० हजारांहून अधिक लोक एकाच वेळी बसून सामना पाहू शकतील. आज जग क्रिकेटच्या माध्यमातून भारताशी जोडले जात आहे. विविध देश क्रिकेट खेळण्यासाठी भारतात येत आहेत. नरेंद्र मोदी, पंतप्रधान